IPL 2020, RCBvsSRH : आयपीएल 2020 मध्ये शेवटचे दोन सामने पराभवाचा सामना करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुकबला आहे. आजचा सामना जिंकून बंगलोर प्ले ऑफमधील आपली जागा पक्की करण्यासाठी मैदानात उतरले. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादलाही विराट कोहलीच्या आरसीबीला हरवून आयपीएलच्या प्लेऑफसाठी आपल्या आशा जिवंत ठेवण्याची इच्छा असेल. सध्या फक्त चेन्नई सुपर किंग्ज एकमेव संघ आहे जो प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नई वगळता उर्वरित सहा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत.


प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला आजचा सामना जिंकणे आवश्यक


मागील दोन सामन्यात चेन्नई आणि मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला तरी बंगलोरची स्थिती पॉईंट टेबलमध्ये सनरायझर्सपेक्षा चांगली आहे. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी बंगलोरला हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकणे गरजेचं आहे. हे दोन्ही सामने जरी बंगलोरने गमावले तरी त्यांच्याकडे 14 गुण असतील आणि नेट रन रनच्या आधारे अजूनही बंगलोरचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकतो. मात्र शेवटच्या दोन सामन्यांत पराभवामुळे बंगलोरच्या नेट रन रेटवर परिणाम होईल आणि अशा परिस्थितीत संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्यामुळे दोन पैकी एक सामना जिंकून बंगलोर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.


सनरायझर्सला सलग दोन सामने जिंकणे आवश्यक


सनरायझर्स हैदराबादचे सध्या 12 सामन्यांत 10 गुण आहेत. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. बंगलोरनंतर सनरायझर्सचा मुंबईशी सामना आहे. सनरायझर्सने दोन्ही सामने जिंकणे पुरेसे नाही तर बंगलोर आणि दिल्ली (दोघेही 14 गुण) यापैकी एक संघ 16 गुण मिळवण्यात अपयशी ठरला पाहिजे. अशा परिस्थितीत सनरायझर्स चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते. बंगलोरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर सलग दोन पराभवानंतर आता काळजीपूर्वक खेळण्याची गरज आहे.