IPL 2020, MIvsDC : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 9 विकेट्सनी धुवा उडवला. दिल्लीने दिलेल्या किरकोळ 111 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनीही त्याला साथ देत चांगली कामगिरी केली. तर दिल्लीच्या आजच्या पराभवानतंर प्ले ऑफमधील आव्हान खडतर बनलं आहे. मुंबई पाँईट टेबलमध्ये 18 अंकांसह अव्वल स्थानी आहे तर दिल्ली 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.


मुंबईकडून ईशान किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. ईशान किशनने 42 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली. या खेळीत ईशान आठ चौकार आणि तीन षटकार लगावले. तर क्विंटन डीकॉकने 26 तर सूर्यकुमारने 12 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिक नॉर्टजेन एक विकेट घेतली.


मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा संघ 110 धावाच करु शकला. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला. पृथ्वी शॉ 10 धावा काढून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यरने 25 तर ऋषभ पंतने 21 धावा केल्या. थिमरन हेटमायरने 11, आर अश्विन 12, कसिगो रबाडाने 12 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3-3 तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी 1-1 बळी घेतला.