मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन भाजप नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पोंक्षे हे नाव महाविकासआघाडीतील राष्ट्रावादी आणि काँग्रेसला चालणार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.


विधान परिषदेवर 12 आमदारांना नियुक्त करण्यासाठी राज्यपाल कडक नियम लावणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्येक पक्ष राज्यपाल ग्राह्य धरतील अशीच नावे देण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पोंक्षे यांचं नाव याच चौकटीत बसणारे आहे. शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकर यांच्यावरुन भाजप नेहमीच टार्गेट करत असते. त्यासाठी शरद पोंक्षे हे नाव परफेक्ट समजले जात आहे. पोंक्षे हिदुत्व आणि विशेषतः सावरकरवादी असल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.


निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत


मात्र, महाविकासआघाडील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना हे नाव चालणार आहे का? कारण, सावरकर मुद्द्यावरुन पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मदतभेद राहिले आहेत. दरम्यान, एबीपी माझाने शरद पोंक्षे यांना संपर्क साधला असता यासंदर्भात मला अद्याप विचारणा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देऊ नये : आरपीआय
शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत चर्चेत असल्याचे समजते. अस्पृश्यतानिवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देऊ नये, अशी विनंती आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलीय.


शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा होकार?


शिवसेना हा वेगळा पक्ष आहे, बघू, त्यांना अधिकार आहे आपली नावे ठरवण्याचा. पण आम्ही खूप विचार करून चांगले उमेदवार दिले आहेत, अशी प्रतिक्रिया उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर पोंक्षेवर आता बोलण्यात काही अर्थ नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.


प्रत्येक चॅनलची यादी वेगळी : खासदार संजय राऊत
विधानपरिदषदेच्या उमेदवारांची चर्चा चॅनेलवरच आहे. प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे. मुख्यमंत्री जर कोणाशी बोलणी करत असतील तर ते गोपनीय राहतं. त्याची अशी चर्चा होत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नावांबद्दल होणाऱ्या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.


Sharad Ponkshe | विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांच्या नावाची चर्चा