IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलच्या 13व्या मोसमाची विजयी सांगता केली. चेन्नईनं अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबवर नऊ विकेट्सनी मात केली. या पराभवासह पंजाबचं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. पंजाबनं या सामन्यात चेन्नईसमोर 154 धावांचं माफक आव्हान ठेवलं होत. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस या जोडीनं 82 धावांची सलमी दिली. ख्रिस जॉर्डननं ही जोडी फोडताना ड्यू प्लेसिसला माघारी धाडलं. ड्यू प्लेसिसनं 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा फटकावल्या.


फाफ ड्यू प्लेसिस बाद झाल्यानंतर फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडनं अंबाती रायुडूला साथीला घेत चेन्नईला विजयपथावर नेलं. ऋतुराजनं सलग तिसरं अर्धशतक झळकावताना 49 चेंडत 62 चेंडूत धावांची खेळी केली. तर रायुडून 30 चेंडूत नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी रचली.


मी पुन्हा येईन..! धोनीकडून आयपीएलच्या पुढच्या मोसमात खेळण्याचे संकेत


पंजाबकडून दीपक हुडाची एकाकी झुंज


नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना पंजाबनं 20 षटकात सहा बाद 154 धावांची मजल मारली. पंजाबकडून दीपक हुडानं एकाकी झुंज देताना नाबाद 62 धावा केल्या. पंजाबचे आघाडीचे चारही फलंदाज लवकर माघारी परतले. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवालनं 48 धावांची सलामी दिली. पण मयांकनंतर राहुल, गेल आणि निकोलस पूरन लागोपाठ बाद झाल्यामुळे पंजाबची अवस्था 4 बाद 72 अशी झाली होती. या परिस्थितीत दीपक हुडानं एका बाजूनं किल्ला लढवला. हुडाची 62 धावांची खेळी ही त्याच्या आजवरच्या आयपीएल कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी ठरली.


पंजाबचं आव्हान संपुष्टात
चेन्नईच्या या विजयासह पंजाबचं आयपीएलमधलं आव्हानही संपुष्टात आलं. परतीच्या सलग पाच सामन्यात विजय मिळवून पंजाबनं चांगलं कमबॅक केलं होतं. पण राजस्थान आणि आज चेन्नईविरुद्ध असे सलग दोन सामने गमावल्यानं पंजाबला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पंजाबनं यंदाच्या मोसमात 14 पैकी सहा सामन्यात विजय मिळवला तर आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.