पंजाब आणि चेन्नई सामन्याआधी या नाणेफेकीचा कौल जिंकला तो कर्णधार धोनीनं. यावेळी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी धोनीला हा चेन्नईच्या पिवळ्या जर्सीतला तुझा शेवटचा सामना आहे का असं विचारलं. तेव्हा धोनीनं हसत हसत "नक्कीच नाही" असं उत्तर दिलं. त्यामुळे धोनी पुढच्या मोसमातही खेळणार हे निश्चित झालं आहे.
सीएसकेंच्या सीईओंचा याआधीच खुलासा
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याआधीच धोनीच्या पुढील मोसमात खेळण्याबाबत खुलासा केला होता. त्यांनी धोनी हा फक्त 2021च नाही तर त्यानंतरच्या मोसमातही खेळेल असं म्हटलं होतं. विश्वनाथन यांच्या त्या वक्तव्यावर आज धोनीच्या म्हणण्यानं शिक्कामोर्तब झालं.
IPL 2020 KKRvsRR: राजस्थान-कोलकाता आमने-सामने; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक
धोनीची यंदाची कामगिरी जेमतेमच
महेंद्रसिंग धोनीला यंदा लौकीकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 14 सामन्यात धोनीच्या बॅटमधून केवळ 200 धावाच निघाल्या. त्यात त्याची सरासरी होती केवळ 25. याआधीच्या मोसमात कित्येक सामने एकाहाती जिंकून देणारा धोनी यंदाच्या मोसमात मात्र कुठेच दिसला नाही.
चेन्नई साखळी फेरीतूनच बाहेर
चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा मोसम खूपच खराब राहिला. सलामीच्या सामन्यात मुंबईला हरवून दमदार सुरुवात केल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या कामगिरीचा आलेख हा उतरताच राहिला. त्यामुळे तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नईला आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच साखळी फेरीतूनच बाहेर व्हावं लागलं.