चेन्नई : आयपीएलमध्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा तब्बल 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा आजच्या सामन्याचे शिल्पकार ठरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु अवघ्या 109 धावात चेन्नईचा संघ बाद झाला. हा सामना जिंकून मुंबईने गुणतक्त्यात पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले आहे. सामन्यानंतर रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले


प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 4 बाद 155 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार ठोकत 67 धावा केल्या. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. अखेरच्या षटकात फटकेबाजी करुन हार्दिक पंड्याने (18 चेंडूत 23 धावा) मुंबईला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. चेन्नईच्या गोलंदाजांनी आज मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते.

156 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. चेन्नईकडून एकट्या मुरली विजयने (35 चेंडूत 38 धावा) किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ चेन्नईचे सर्व फलंदाज बाद केले.

मुंबईकडून लसिथ मलिंगाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मलिंगाने 3.4 षटकात 37 धावा देत 4 बळी घेतले. कृणाल पंड्याने 3 षटकात 7 धावा देत 2 गडी बाद केले. तसेच जसप्रीत बुमराहने 3 षटकात 10 धावा देत 2 गडी बाद केले.