मुंबई : देशातली हवा मुंबईकरांना लवकर समजते, देशातली हवा भाजपसोबत आहे. काँग्रेसची स्थिती विदारक आहे. त्यांची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी वांद्र्यातील बीकेसीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदींनी मध्यमवर्गीयांसह कोळी बांधव, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

कसं काय मुंबई? सगळं काही ठीक आहे ना? असं विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लौकिकानुसार मराठीत भाषणाला सुरुवात केली. मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. माझे लहान भाऊ उद्धव ठाकरेजी असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत.

भाजप नाही, तर सर्व सर्व्हे म्हणत आहेत की एनडी 300 चा आकडा पार करेल. 325 च्या पार जाईल, 400 पर्यंत पोहचेल, देशातील सर्वात जुना पक्ष 50 चा आकडा तरी पार करेल, की 40 वरच थांबेल, अशी चर्चा असल्याचंही मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या, फक्त 44. तर 2019 मध्ये काँग्रेसने आतापर्यंत सर्वात कमी जागा लढवल्या आहेत, हे या निवडणुकीचं विशेष असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.



मुंबईची जनता हवेची दिशा ओळखण्यात माहीर आहे. मत बरबाद करण्यात समजूतदारपणा आहे, की उपयुक्त ठरवण्यात आहे, याचा विचार करा, असंही मोदी म्हणाले.

'देशाच्या सांस्कृतिक नगरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सामर्थ्य-समृद्धी असलेल्या नगरीतून आशीर्वाद घ्यायला आलो. आज उद्धव ठाकरेंचे जाहीर आभार मानतो की त्यांनी वाराणसीत यायला वेळ काढला.' अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंचे आभार व्यक्त केले.

काँग्रेस आता कन्फ्युजनचं दुसरं नाव झालंय. दुनिया बदलली, जमाना बदलला, हे मान्य करायला ते तयारच नाहीत. ही विकल्पची नाही संकल्पाची निवडणूक आहे, वाद्यांची नाही इराद्यांची निवडणूक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

मी मुंबईच्या समुद्र तटाला सुरक्षित ठेवणाऱ्या कोळी बांधवांचे आभार मानायला आलोय. काळी पिवळी टॅक्सी चालकांनी कधी मुंबईचा वेग कमी होऊ दिला नाही, त्यांचे आभार मानायला आलो आहे, असंही मोदींनी सांगितलं.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, अतिरेक्यांना घुसून मारणार, अशी गर्जनाही मोदींनी केली.

मोदींचं देशातील मध्यमवर्गीयांसमोर नमन

राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वात मोठं योगदान मध्यमवर्गीयांचं आहे. माझा जन्म झाला, तेव्हा देवाने माझ्या सॉफ्टवेअरमध्ये छोटा विचार दिलाच नाही, मोठा विचार करण्यासाठीच बनवलं आहे. इतर अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षा आपल्या देशात आयुष्यमान भारत योजनेचा लाभ झाला आहे. मध्यमवर्गीयांच्या करामुळेच देशाचा उद्धार होत आहे, अशा शब्दात मोदींनी मध्यमवर्गाचं कौतुक केलं.

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह शिवसेना-भाजपमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. लातूरमधील सभेनंतर पुन्हा एकदा उद्धव आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले.

नरेंद्र मोदींच्या सभेला अंबानींचे पुत्र अनंत अंबानी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, अशी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया सभेला उपस्थित अनंत अंबानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली.