श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स आणि केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद... आयपीएलमधल्या या दोन तगड्या फौजा सज्ज झाल्यायत एका नॉकआऊट मुकाबल्यासाठी... दिल्ली आणि हैदराबाद संघांमधला हा मुकाबला आहे प्ले ऑफमधल्या एलिमिनेटरचा... आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवर आलेल्या संघांमधली प्ले ऑफची लढाई म्हणजेच एलिमिनेटरचा मुकाबला...


एलिमिनेटर या शब्दांतच या मुकाबल्याचं नॉकआऊट महत्त्व दडलंय... हरला तो संपला हेच आहे एलिमिनेटर मुकाबल्याचं सूत्र... त्यामुळे एलिमिनेटर सामना गमावला की, त्या संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. आणि विजयी संघाला क्वालिफायर टू सामन्याचं म्हणजे दुसऱ्या उपांत्य सामन्याचं तिकीट मिळेल. त्याच तिकीटाच्या ईर्षेने दिल्ली आणि हैदराबादच्या फौजा विशाखापट्टणमच्या मैदानात उतरतील.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आमनेसामने येण्याची दिल्ली आणि हैदराबादची ही तिसरी वेळ आहे. साखळीतल्या पहिल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पाच विकेट्सनी, तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 39 धावांनी धुव्वा उडवला होता.

दिल्ली आणि हैदराबादची एकमेकांविरुद्धची कामगिरी ही 1-1 असली तर यंदाच्या मोसमात दिल्लीने हैदराबादच्या तुलनेत सरस कामगिरी बजावली आहे. दिल्लीने साखळीतल्या चौदापैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवून 18 गुणांसह तिसरं स्थान राखलं, तर हैदराबादने चौदापैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून 12 गुणांसह चौथं स्थान राखलं.

दिल्ली आणि हैदराबाद संघांमधला हा फरक डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो माघारी परतल्यानं आणखी मोठा झालाय. विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी मायदेशी परतण्याआधी त्या दोघांनीही हैदराबादसाठी धावांचा मोठा रतीब घातला होता. वॉर्नरच्या नावावर बारा सामन्यांमध्ये 692 धावा, तर बेअरस्टोच्या नावावर 10 सामन्यांमध्ये 445 धावा जमा आहेत. त्या दोघांच्या अनुपस्थितीत आता हैदराबादच्या फलंदाजीची सारी जबाबदारी मनीष पांडे, कर्णधार केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्या खांद्यावर आहे. मनीष पांडेने 11 सामन्यांमध्ये 314, केन विल्यमसनने आठ सामन्यांमध्ये 128 आणि विजय शंकरने 14 सामन्यांमध्ये 219 धावा फटकावल्या आहेत.

दिल्लीनं डेअरडेव्हिल्सऐवजी आपल्या नावाला यंदा कॅपिटल्स जोडलं आणि त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीला बहर आला. कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि शिखर धवन या तिघांनी चारशेहून अधिक धावा फटकावल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या खात्यात 14 सामन्यांमध्ये 442, रिषभ पंतच्या खात्यात 14 सामन्यांमध्ये 401 आणि शिखर धवनच्या खात्यात 14 सामन्यांमध्ये 486 धावा आहेत. पृथ्वी शॉ आणि कॉलिन इन्ग्राम हे दोघंही यंदाच्या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पृथ्वीने 14 सामन्यांमध्ये 292 आणि कॉलिन इन्ग्रामने 12 सामन्यांमध्ये 184 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा दिल्लीच्या यंदाच्या मोसमातल्या यशाचा मोठा शिल्पकार ठरलाय. त्याने बारा साखळी सामन्यांमध्ये तब्बल 25 फलंदाजांना माघारी धाडलं. पण त्याच रबाडाला दुखापतीमुळं माघारी परतावं लागलं. त्याच्या अनुपस्थितीत दिल्लीची मदार ख्रिस मॉरिस, ईशांत शर्मा, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांच्यावर राहिल. ख्रिस मॉरिसने नऊ सामन्यांमध्ये 13, ईशांतने 11 सामन्यांमध्ये दहा, अमित मिश्रानं नऊ सामन्यांमध्ये नऊ आणि अक्षर पटेलने 12 सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या आहेत. हैदराबादच्या आक्रमणाची भिस्त भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, रशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यावर राहिल. भुवनेश्वर कुमारने 14 सामन्यांमध्ये 11, खलिल अहमदने आठ सामन्यांमध्ये 17, रशिद खानने 13 सामन्यांमध्ये 15 आणि मोहम्मद नबीने सात सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत. संदीप शर्माच्याही खात्यात 11 सामन्यांमध्ये 12 विकेट्स आहेत.

आयपीएलचा आजवरचा इतिहास लक्षात घेतला, तर हैदराबादने 2009 साली डेक्कन चार्जर्स आणि 2016 साली सनरायझर्स हैदराबादच्या रुपाने विजेतेपदाचा आनंद साजरा केला आहे. त्याउलट दिल्लीला आजवर विजेतेपद पटकावायचं दूरच, पण फायनलमध्येही कधी धडक मारता आलेली नाही. त्याच दिल्लीने 2012 सालानंतर यंदा पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. यंदाच्या मोसमातला दिल्ली कॅपिटल्सचा एकंदर नूर पाहता त्यांचा इरादा इतिहास बदलण्याचाच दिसतो.