जालना : आपला मुलगा मल्हारचं लग्नही सामूहिक विवाह सोहळ्यात लावण्याचा मानस ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.
दुष्काळात आधार देण्यासाठी भाईश्री आणि नाम फाऊंडेशनच्या वतीने जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.


सामूहिक विवाह सोहळ्यात 48 जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली. या सामूहिक विवाह सोहळ्याला अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली होती.

अशाच विवाह सोहळ्यात नाना पाटेकर यांनी आपला मुलगा मल्हार याचा विवाह करणार असल्याच सांगितलं. तर मकरंद अनासपुरे यांनी देखील एक गाव एक तिथी असं लग्न करुन विवाह सोहळ्यांमध्ये होणाऱ्या खर्चाला फाटा देण्याचं आवाहन केलं.



भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने नवविवाहित जोडप्यांना मंगळसूत्र, पैंजण आणि संसार उपयोगी साहित्यही देण्यात आलं. भाई श्री फाऊंडेशनच्या वतीने सामूहिक सोहळ्याचं हे सातवं वर्ष होतं. आजपर्यंत या फाऊंडेशनने 431 जोडप्यांचे संसार उभे केले आहेत.

गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या वडिलांना मुलीच्या लग्नाची चिंता अधिक असते. त्यातच गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे कित्येक मुलींच्या वडिलांना मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होती. यामुळेच या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचं भावेश पटेल यांनी सांगितलं. हा सामूहिक विवाह सोहळा हे समाजकार्य असल्याचंही पटेल म्हणाले.