Shooter Khushseerat Kaur Sucide : आंतरराष्ट्रीय महिला शूटर खुशसीरत कौर संधू (Khushseerat Kaur Sandhu) हीने तिच्याच परवाना असलेल्या .22 पिस्टलने स्वत:ला गोळी झाडून घेत जीवन संपवलं आहे. तिच्या पंजाबमधील फरीदकोट येथील राहत्या घरीच तिने आत्महत्या केली आहे. 17 वर्षीय खुशसीरतने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं पटकावली आहेत. नुकतंच तिने पेरु इथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील (ISSF Junior World Championship) 25 मीटर पिस्टल स्पर्धेत भारताकडून सहभाग घेतला होता. पण तिने तणावाखाली येऊन हे पाऊल उचलंल असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय शूटींग चॅम्पियनशिपमध्ये (64th National Shooting Championship) खुशसीरतची कामगिरी खास नसल्याने त्याच तणावाखाली तिने हे पाऊल उचल्याचं तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.


गुरुवारी सकाळी खुशसीरतच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाली. तसं त्यांनी लगेचच पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या माहितीनुसार कोणतीच सुसाईड नोट किंवा संशयित वस्तू सापडलेली नाही. प्राथमिक तपासातून खुशसीरतने हे पाऊल तणावाखाली येऊन उचललं असल्याचं समोर येत आहे. तरी पोलिस इतरही पैलूंनी तपास करत आहेत. 


11 पदकांची कमाई


खुशसीरतने एक जलतरणपटू म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्यानंतर तिने नेमबाजी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. 2019 या वर्षात तिने विविध पिस्टल नेमबाजी स्पर्धांमध्ये 11 पदंक मिळवली. यामध्ये सुवर्णपदकांचाही समावेश असून तिने 25m पिस्टल स्पर्धांसह 10m एअर पिस्टल स्पर्धांमध्येही पदक पटकावलं आहे.


चार महिन्यांतील तिसरी घटना 


खुशसीरतच्या आत्महत्येनंतर भारतीय नेमबाज क्षेत्रातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. कारण खुशसीरतची आत्महत्या ही मागील चार महिन्यातील तिसऱ्या शूटरने केलेली आत्महत्या आहे. ऑक्टोबरमध्ये हुनरदिप सिंह सोहल (Hunardeep Singh Sohal) याने आत्महत्या केली होती. दुखापतीमुळे त्याच्या नेमबाजी कारकिर्दीवर परिणाम झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं होतं. तर त्याआधी सप्टेंबरमध्ये मोहालीच्या नमनवीर सिंह ब्रार (Namanveer Singh Brar) यानेही आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha