Rahul Dravid : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाला नव्या उंचीवर नेले होते. काही संस्मरणीय विजयदेखील या जोडीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आले. रवी शास्त्रींच्याऐवजी राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतर टीम इंडियाची पुनर्बांधणी होईल असा कयास बांधला जात आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील जुन्या परंपरा सुरू केल्या आहेत. या परंपरा कोहली-शास्त्री यांच्या काळात बंद करण्यात आल्या होत्या.


कसोटी सामन्यानंतर ग्राउंड्समॅनला बक्षिसे देण्याची परंपरा राहुल द्रविड यांनी पुन्हा सुरू केली. कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर 35 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतरही वानखेडेवरील ग्राउंड्समॅनला 35 हजारांचे बक्षीस देण्यात आले. चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल हे बक्षीस देण्यात आले. ही जुनी परंपरा लुप्त होत चालली होती. 


कसोटी संघात नवीन खेळाडूचे पदार्पण झाल्यानंतर त्याला कसोटी संघाची कॅप देण्यात येते. कपिल देव ते धोनी यांच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात ही परंपरा सुरू होती. कोहली-शास्त्रींच्या काळात पहिला सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूला संघातील ज्येष्ठ सहकारी, कोच यांच्या हस्ते टेस्ट कॅप दिली जायची. राहुल द्रविड यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर नव्या खेळाडूला टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंच्या हस्ते टेस्ट कॅप देण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे माजी दिग्गज कसोटीपटू, लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांच्या हस्ते श्रेयस अय्यर याला टेस्ट कॅप देण्यात आली. 


राहुल द्रविड यांनी आणखी एक निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या कसोटी संघामध्ये निवड होण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) कामगिरीचा विचार केला जाणार नाही. त्याशिवाय एखाद्या खेळाडूला संघात पुनरागमन करायचे असल्यास त्यांना त्याला स्थानिक सामन्यात फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करावे लागणार आहे. अनिल कुंबळे हे टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना असाच निर्णय घेण्यात आला होता. अनफिट आणि खराब फॉर्म असलेल्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागत होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: