Covid-19 vaccine certificate : भारतासह जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवलाय. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात आली. 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण वेगानं सुरु आहे. लसीकरणाला वेग आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला. त्यामुळे पुन्हा लॉकडान लागणार का? यासारख्या चर्चेला सुरुवात झाली. आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका आणि नेहमीच मास्क वापरा, असं राज्य आणि केंद्र सरकारकडून आवाहन कऱण्यात येत आहे. तसेच कोरोना प्रमाणपत्र सोबत असणे सक्तीचं केलं आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आज सर्वच ठिकाणी सक्तीचं आणि महत्वाचं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन आपण दोन डोस घेतल्याचा दाखला हे प्रमाणपत्र आहे. लसीकरणाद्वारे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा देशात अन् विदेशात प्रवास करू शकता. अशातच काही लोकांना लसीकरणाचं प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करावं, याबाबतची माहिती नसते. ऐन वेळी एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं प्रमाणपत्र मागितल्यानंतर गोंधळ उडतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र मोबाईलमध्ये सेव्ह ठेवण्याच्या पाच सोप्या पद्धती आज आम्ही सांगणार आहोत. 


व्हॉट्सअॅप - 
व्हॉट्सअॅपवर कोरोना लसीचे प्रमाणपत्र काही मिनिटांत सहज मिळवू शकता. प्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा. व्हॉट्सअॅप चॅट उघडा आणि वरील क्रमांकावर कोविड प्रमाणपत्र (covid certificate) टाइप करा.  त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल. हा OTP व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 9013151515 हा नंबर व्हॉट्सअॅपवर पिन टू टॉप करा. तुम्हाला कुणी प्रमाणपत्र मागितले तर क्षणात व्हॉट्सअॅप उघडून तुम्ही प्रमाणपत्र दाखवू शकता....


आरोग्य सेतू अॅप -  
आरोग्य सेतू अॅपद्वारे तुम्ही कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करुन मोबाईलमध्ये सेव्ह करु शकता. त्यासाठी काही सोप्य स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा. जर आधीपासूनच तुमच्या मोबाईलमध्ये अॅप असेल तर ते अपडेट करा. आरोग्य सेतू अॅपमध्ये Vaccination या पर्यावर जा. त्यानंतर रजिस्टर मोबाईल क्रमांक टाका...त्यानंतर तुमच्या क्रमांकावर आलेला OTP पोस्ट करा.. तुम्हाला लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करावं लागेल. https://www.cowin.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊनही तुम्ही लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकता. 
 
स्कॅन करुन अथवा फोटो घेऊन - 
तुमच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र असेल तर त्याचा स्मार्टफोनमध्ये फोटो काढून घ्या. अथवा त्यावर असलेल्या QR code कोडद्वारे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकता. हा फोटो तुम्ही स्मार्टफोनमध्ये स्टार मार्क करुन ठेवू शकता. 


डिजिलॉकर - 
डिजिलॉकरद्वारेही (Digilocker) कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवू शकता अथवा मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता. डिजिलॉकर या अॅपवर एकाच ठिकाणी सर्व प्रकारची सरकारी प्रमाणपत्रं मिळतात. यामध्ये लायसन, दहावी-बारावी परीक्षाचे निकाल, लसीकरण प्रमाणपत्र, आधार कार्ड यासारखी सर्व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळतात... डिजिलॉकरवर तुम्ही असाल तर तुम्हाला लगेच कोरोना प्रमाणपत्र मिळेल. 
 
गुगल ड्राइव्ह- वन-ड्राइव्ह 
कोरोना प्रमाणपत्र गुगल ड्राइव्ह आणि वन-ड्राइव्ह इथं अपलोड करुन सेव्ह करु शकता. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही हे प्रमाणपत्र इंटरनेट कनेक्शन आणि वेब ब्राऊजरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकता.