Farmers Protest Called Off : कृषी कायद्यांविरोधात तब्बल 378 दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन (Farmers Protest) मागे घेतल्याचे शेतकरी नेत्यांनी नुकतेच जाहीर केले. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी शेतकरी आंदोलन (Farmers Protest) संपवण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांचाही मोठा सहभात होता. त्यातीलच शेतकरी नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी या आंदोलनातील काही अनुभव सांगितले आहेत. प्रतिभाताई या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सिंघू बॉर्डरवर तळ ठोकून बसल्या होत्या. आंदोलन चिरडण्यासाठी अनेक कट-कारस्थाने झाली. वाटेत खिळे ठोकण्यापासून ते शेतकऱ्यांच्या अंगावर पाणी मारणे. अशी एक ना अनेक  कारस्थाने झाली परंतु, महाराष्ट्राची ही वाघीन मागे हटली नाही.  


शेतकरी आंदोलनादरम्याम 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मरण पावलेल्या महिलांमध्ये महाराष्ट्राच्याही एका महिलेचा समावेश असल्याचे प्रतिभाताईंनी सांगितले. महाराष्ट्रातल्या सीताबाई तडवी या ऐतिहासिक आंदोलनाल्या पहिल्या महिला शहीद झाल्या आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहेत. तेलंगणा तर त्यांचा एकही शेतकरी शहीद नसताना सर्व शहिदांना मदत करत आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकार याबाबत अजून का उदासीन का? असा प्रश्न उपस्थित करत "महाविकास आघाडी सरकारने लखीमपूरच्या घटनेमध्ये बंद केला, पण आपली एक महिला शहीद होऊनही तिची साधी नोंदही नाही," याबाबत प्रतिभाताई शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. 


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत? 
"शेतकरी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातही आंदोलनं झाली. त्यात जवळपास 20 हजार गुन्हे दाखल झाले आहेत पण अजूनही या केसेस मागे का घेतल्या गेलेल्या नाहीत?" असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. 


"शेतकरी आंदोलनांना फुटीचा शाप आहे असं म्हटलं जातं. इतिहासात अनेक संघटना देखील फुटत आल्या आहेत. पण या आंदोलनात ते होऊ दिलं नाही. कुठलाही राजकीय नेता स्टेजवर येणार नाही हे पहिल्यापासून ठरवलं होतं ते कायम राहिलं. त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झालं. या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याचे," शिंदे यांनी सांगितले. 


"जातीपाती पलीकडे जाऊन सर्व जातींचे शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले. मुजफ्फरनगर महा पंचायतीत हर हर महादेव, अल्लाहू अकबर, संत श्री अकालसह सर्व घोषणा एकत्रित दिल्या गेल्या. आमच्यासारख्या काही लोकांना शंका होती कायदे मागे घेतले जातील का? कारण मोदींना मी गुजरातमध्ये पाहिलं होतं. आंदोलना प्रति त्यांचा असलेला राग आम्हाला माहिती होता. पण हे पंजाबचे सगळे साथी तुस्सी चिंता ना करो असं म्हणत पहिल्यापासून ठाम होते."


"लोकांनीही या आंदोलनाला खूप मदत केली. एकट्या सिंघू बॉर्डरवर केवळ पैशांच्या रुपात सहा कोटी रुपयांची मदत ऑडिटसह जमा झाली. बाकीची वस्तू रुपी मदत तर खूप मोठ्या प्रमाणात जमा झाली. स्वातंत्र्याचं आंदोलन तर आम्ही बघितलं नाही पण हे आंदोलन पाहिलं. त्या आंदोलना प्रमाणेच हे देखील अहिंसेच्या मार्गाने झालेलं आंदोलन आहे. परंतु, दुर्देवाची बाब म्हणजे 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. देशाच्या इतिहासात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील पण समर्थकांच्याही ही केसेस मागे घ्याव्या लागल्या." असे शिंदे म्हणाल्या.  


संबंधित बातम्या 


Farmers Protest Called Off : अखेर 378 दिवसांनी ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित


End of Farmers Protest : आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग; उद्या राजधानीच्या सीमेवर 'आनंदोत्सव'