कोलंबो : मोना मेश्राम आणि मिताली राज यांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या अभेद्य शतकी भागिदारीने भारतीय महिलांना बांगलादेशवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह कर्णधार मिताली राजच्या भारतीय महिला संघाने इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषकाचं तिकीट कन्फर्म केलं आहे.
श्रीलंकेत सुरु असलेल्या महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय महिलांचा हा सलग सहावा आणि सुपर सिक्समधला सलग दुसरा विजय ठरला.
बांगलादेशने भारताला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताची दीप्ती शर्मा स्वस्तात माघारी परतली. पण मोना मेश्राम आणि मिताली राज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मोना मेश्रामने 12 चौकारांसह नाबाद 78 धावांची, तर मिताली राजने 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 73 धावांची खेळी उभारली. भारताकडून मानसी जोशीने तीन आणि देविका वैद्यने दोन विकेट्स काढून बांगलादेशला 20 षटकांत आठ बाद 155 असं रोखलं होतं.