नाशिक: नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयानं उपचार करण्यास टाळाटाळ केल्यानंतर माहेरी निघालेल्या महिलेची बसमध्येच प्रसुती झाली. नाशिक-अक्कलकुवा बसमध्ये ही घटना घडली.

नामपूरजवळच्या शारदा या गावात मोलमजुरी करणाऱ्या माई गायकवाड या महिलेचं हे पहिलंच बाळंतपण होतं. कळवणच्या ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. पण हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगत त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथेही बाळ बाळंतीणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं.

अखेर पैसे नसल्यानं हतबल झालेली महिला माहेरला परत जात असताना बसमध्येच तिची प्रसुती झाली. पिंपळगाव बसवंत या गावातील काही नागरिक या महिलेच्या मदतीला धावून आले. त्यानंतर माई गायकवाड यांनी मुलाला जन्म दिला असून ते दोघेही सुखरूप आहेत.