नाशिक : सभेतली गर्दीच आपला विजय निश्चित करत आहे, भाजपने पैसे फेकले आणि ते गेले, पण ते एकटेच गेले आहेत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना ठणकावलं.


नाशिक महापालिकेवर पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही, हे झालं म्हणूनच काही जणांनी पक्ष सोडला, असंही राज ठाकरे म्हणाले.

नाशिक म्हणजे मनसेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची विराट प्रचार सभा पार पडली. सभेला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याच सभेत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या 'माझा शब्द' या जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांची नक्कल

नाशिकमध्ये काल शिवसेनेची सभा झाली, उद्या मुख्यमंत्र्याची होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नक्कल करुन दाखवली. मुख्यमंत्री येऊन केवळ आश्वासन देऊन जातील, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. शिवाय राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं 'भाजपकुमार थापाडे' असं नामकरणही केलं.

''काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपची वाटचाल''

काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप-शिवसेनेलाही सत्तेचा आणि पैशाचा माज आला आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. शिवसेना-भाजपने एकट्या नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 88 उमेदवार दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अशा गुंडांच्या हातात सत्ता गेली तर नाशिकचं काय होईल, असा प्रश्न पोलिसांनी पडला आहे. पोलिसांनीच या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत माहिती दिली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

''कुंभमेळ्याला निधी देण्यात भेदभाव का?''

कुंभमेळ्यावेळी उज्जैनला 2200 कोटी रुपयांचा निधी दिला आणि नाशिकला केवळ 1100 कोटी देत भेदभाव केला गेला. पण कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापौरांचा सत्कार अमेरिकेत झाला, मुख्यमंत्र्यांचा नाही, कारण व्यवस्थापनाचं काम महापालिकेनं केलं, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.

नाशिकच्या विकासकामांचं सादरीकरण

नाशिकमध्ये मनसेने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचं राज ठाकरेंनी नाशिककरांसमोर सादरीकरण केलं. आधीची परिस्थिती कशी होती आणि मनसेची सत्ता आल्यानंतर कशा प्रकारे विकासकामं झाली, ते राज ठाकरेंनी समजावून सांगितलं.

नाशिकमध्ये सत्ता आल्यानंतर 2 वर्षे आघाडी सरकारने आयुक्त दिले नाही. त्यात नंतरच्या तीन वर्षात तीन आयुक्त बदलून गेले. पण कोणालाही विचारा, मी कधीही कोणत्याही टेंडर करता किंवा वैयक्तिक कामांकरता एकही फोन केला नाही, असं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

शिवाय नाशिक महापालिकेवर पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही, हे झालं म्हणूनच काही जणांनी पक्ष सोडला, असंही राज ठाकरे म्हणाले.

नाशिकमध्ये दादासाहेब फाळके स्मारक बांधायचं असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. हे स्मारक एवढं सुंदर असेल की, बॉलिवूडचे अभिनेते-अभिनेत्री स्वतःहून इथे येऊन स्मारक पाहतील, असं ते म्हणाले.

सीएसआर निधीतून कामं

रतन टाटांना विनंती केली आणि त्यांनी टाटा ट्रस्टच्या सीएसआरमधून बोटॅनिकल गार्डनच्या नवनिर्माणाला निधी उपलब्ध करून दिला.

मुकेश अंबांनींना गोदा पार्कची संकल्पना सांगितली आणि त्यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला. त्यातून देशातला वाहत्या पाण्यातला सर्वात उंच 100 फुटी कारंजा नाशिकमध्ये उभारला, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

जीव्हीके समूहाला विनंती केली आणि त्यांनी तात्काळ बाळासाहेबांच्या ऐतिहासिक शस्त्र संग्रहालयाला सीएसआरमधून निधी दिला. बाळासाहेबांचं स्मारक त्यांना शोभेल असं असलं पाहिजे, म्हणूनच बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय उभारलं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

नाशिकमध्ये 5 एकरमध्ये महिंद्रा समूहाच्या सीएसआर निधीतून चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क उभारलं.

जीपीएसने सुसज्ज 200 घंटागाड्या नाशिक शहराचा कचरा उचलतात. कचरा उचलला जातो की नाही याचंही ट्रॅकिंग केलं जातं.

20 लाख लिटर्सच्या 17 पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. नाशिकमध्ये मुकणे धरणातून 16 किलोमीटरची थेट पाईपलाईन टाकली, त्यामुळे शहराचा 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटेल, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

नाशिकमधला 25 वर्षे जुना अनधिकृत भंगार बाजार 2 दिवसात बुलडोझरने साफ करून टाकला. नाशिकमध्ये 510 किलोमीटरचे म्हणजे मुंबई ते गोवा एवढ्या अंतराचे रस्ते बांधले ते राज ठाकरेंनी पॉवर पॉईंट प्रझेंटेशन करुन सांगितलं.

LIVE UPDATES :

  • आधी विमानसेवा आणा नाशिकमध्ये मग बाकी आणा

  • शहरांचा विकास ही माझी पॅशन आहे, हा माझ्यासाठी राजकारणाचा विषय नाही. : राज ठाकरे

  • कुंभमेळ्यावेळी उज्जैनला 2200 कोटी आणि नाशिकला 1100 कोटी देत भेदभाव केला गेला

  • कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापौरांचा सत्कार अमेरिकेत झाला, मुख्यमंत्र्यांचा नाही : राज ठाकरे

  • काँग्रेस, राष्ट्रवादी प्रमाणेच भाजप सत्तेचा माज करत आहे, 88 गुन्हेगारांना निवडणुकीत तिकीट दिलं : राज ठाकरे

  • स्विस बँक खातेधारकांची नावं देऊच शकत नाही : राज ठाकरे

  • स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी द्या : राज ठाकरे

  • नाशिकची व्हायरल विकास नियमावली सांगते, 9 मीटर खालील रस्त्यांवरील घरांना वाढीव एफएसआय मिळणार नाही :राज ठाकरे

  • आजची सभाच आपला विजय निश्चित करत आहे, जे गेले ते एकटे गेले : राज ठाकरे

  • थापा या शब्दाला पर्याय भाजप : राज ठाकरे

  • नाशिक विकास नियमावलीमुळे अर्धे नाशिक विस्थापित होणार : राज ठाकरे

  • नाशिक महापालिकेवर गेल्या पाच वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, म्हणूनच काही जण बाहेर गेले : राज ठाकरे

  • नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेने गुन्हे असलेले 88 उमेदवार उभे केलेत : राज ठाकरे