Achanta Sharath Kamal in CWG : भारताचा आघाडीचा टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने 40 वर्षे वय असताना नुकतीच सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पुरुष एकेरीमध्ये शरथने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्डला मात देत ही कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर शरथने सर्वांसमोर एक नवं प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्समधील शरथचं हे सातवं सुवर्णपदक असून 2006 पासून तो पदकांना गवसणी घालत आहे. 2006 साली 24 वर्षे वय असल्यापासून आता 40 वर्षाचा असतानाही तो पदकं जिंकत आहे.
5 कॉमनवेल्थ स्पर्धा अन् 13 पदकं
शरथ कमलने 2006 साली सर्वात आधी मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. त्यावेळी त्याचं वय 24 वर्षे इतकं होतं. त्याचवर्षी त्याने टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतही गोल्ड जिंकलं होतं. त्यानंतर 2010 साली भारतात झालेल्या कॉमनवेल्थ खेळात पुरुष एकेरी आणि सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं असून पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर 2014 सालच्या ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये केवळ पुरुष दुहेरीत त्याने रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर 2018 सालच्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये शरथने पुरुष एकेरीत कांस्य, पुरुष दुहेरीत रौप्य आणि सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. ज्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थमध्येतर शरथने पुरुष एकेरी, मिक्स्ड डबल आणि सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. तर पुरुष दुहेरीतही त्याने रौप्य पदकाला गवसणी घातली. अशाप्रकारे 2006 ते 2022 सालपर्यंत झालेल्या प्रत्येक कॉमनवेल्थमध्ये शरथने पदक जिंकत एकूण 13 पदकं जिंकली असून त्यातील 7 सुवर्णपदकं आहेत.
2022 मध्ये शरथची 'कमाल'
शरथने यंदा पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं . त्याने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्ड याला 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-7 च्या फरकाने पराभूत करत सुवर्ण जिंकले आहे. याशिवाय टेबल टेनिसमध्ये भारताचा पुरुष दुहेरी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारताला गोल्ड मिळालं नसलं तरी रौप्यपदक मिळालं आहे. अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन या जोडीला फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला आहे. अंतिम सामन्यात अचंता आणि साथियान यांनी चांगली झुंज दिली पण इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पीचफोर्ड यांनी अधिक दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. 11-8, 8-11, 3-11, 11-7 आणि 4-11 अशा फरकाने हा सामना त्यांनी जिंकला. तसंच मिश्र दुहेरीत शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लीन या मलेशियाच्या जोडीचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याने हा सामना 4-1 ने जिंकला.
हे देखील वाचा-