Mukesh Ambani : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही मार्केट कॅपिटलाइजेशन (MCap) च्या माध्यमातून देशातील अव्वल कंपनी बनली आहे. सोमवारी कंपनीने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये कंपनीच्या चेअरमनपासून ते कर्मचाऱ्यांच्या पगारावर चर्चा झाली. यासोबतच कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये किती लोकांना नोकरी दिल्या? हे देखील सांगण्यात आले. रिलायन्सने वर्ष 2022 मध्ये तब्बल 2.32 लाख नोकऱ्या दिल्या, तसेच जिओने 5G कव्हरेजसाठी ब्लू प्रिंट देखील तयार केली असल्याचं मुकेश अंबानी म्हणाले.


रिलायन्सने 2.32 लाख नोकऱ्या दिल्या
अहवालानुसार, रिलायन्स समूहाने 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 2.32 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. कंपनीतील नवीन कर्मचाऱ्यांच्या या संख्येमुळे रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांचा आकडा 3.43 लाख झाला आहे. वार्षिक अहवालात असे सांगण्यात आले की, या कालावधीत रिटेल क्षेत्रात 1,68,910 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, तर रिलायन्स जिओमध्ये 57,883 लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या.


$100 बिलियन पेक्षा जास्त महसूल
मार्केट कॅपच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. तर, गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सच्या नावावर आणखी एक मोठी कामगिरी जमा झाली आहे. आपल्या वार्षिक अहवालात माहिती देताना कंपनीने म्हटलंय की, रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी आहे. जिला FY22 मध्ये वार्षिक आधारावर $100 बिलियन पेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.


5G कव्हरेजसाठी ब्लूप्रिंट तयार 
अहवालात म्हटले आहे की रिलायन्स जिओने देशात 5G कव्हरेजसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. देशातील टॉप 1000 शहरांमध्येही हे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये जिओच्या वाढत्या नेटवर्कचा संदर्भ देत मार्च 2022 मध्ये अखेर जिओच्या ग्राहकांची संख्या 41.02 कोटी असल्याचे सांगण्यात आले. तर जूनअखेर ती वाढून 41.99 कोटी झाली. जिओ ही कोणत्याही देशातील ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत सर्वात मोठी कंपनी आहे.


मुकेश अंबानी यांनी कोणताही पगार घेतला नाही
मुकेश अंबानींना मिळालेल्या पगाराची माहिती देताना रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पगाराशिवाय आपले पद सांभाळत आहेत. कामासाठी 'शून्य' पगार घेण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. कोरोना महामारीमुळे (COVID-19) देशाच्या व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन अंबानींनी स्वेच्छेने आपले मानधन सोडले होते.