यावर्षीच्या आयपीएल स्पर्धा भारतातच, तारीखही ठरली
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले सारे सामने भारतात खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र शासन आणि विविध राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) यंदाचा बारावा मोसम परदेशात खेळवण्यात येण्याची शक्यता मोडीत निघाली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले सारे सामने भारतात खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र शासन आणि विविध राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस आधी, म्हणजे 23 मार्चपासून करण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या शिलेदारांना इंग्लंडमधील विश्वचषकासाठी विश्रांती मिळू शकेल.
बीसीसीआयने माहिती दिली की, 'सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीसोबत मंगळवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आयपीएल 2019 च्या तारखा आणि ठिकाणांबाबत चर्चा करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करु हा निर्णय घेण्यात आला आहे.'
आयपीएलचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालं नाही. लवकरच आयपीएलच्या 12 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर होईल.























