केपटाऊन : भारतीय महिला संघानं वन डे सामन्यांच्या मालिकोपाठापोठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऐतिहासिक दुहेरी यश संपादन केलं आहे. भारतानं पाचव्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय संपादन केला.


याआधी, भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेतली वन डे सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. एखाद्या संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात लागोपाठ दोन मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाचव्या ट्वेन्टी ट्वेन्टीत मिताली राजनं ६२, तर जेमिमा रॉड्रिक्सनं ४४ धावांची खेळी उभारुन भारताला चार बाद १६६ धावांची मजल मारुन दिली होती. त्यानंतर रुमेली धर, शिखा पांडे आणि राजेश्वरी गायकवाडनं प्रत्येकी तीन विकेट्स काढून दक्षिण आफ्रिकेला ११२ धावांत गुंडाळलं.