कोलकाता : रोहित शर्मा आणि रिद्धिमान साहाच्या शतकी भागिदारीनं टीम इंडियाला कोलकाता कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतानं दुसऱ्या डावात आठ बाद 227 धावांची मजल मारली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 339 धावांची आघाडी घेतली आहे.


कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं सात बाद 128 धावांवरून 204 धावांची मजल मारली.त्यामुळं भारताला पहिल्या डावात 112 धावांचीच आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांनी टीम इंडियाची दाणादाण उडवली. भारताचा निम्मा संघ अवघ्या 91 धावांत माघारी परतला. मुरली विजय सात, शिखर धवन 17, चेतेश्वर पुजारा चार आणि अजिंक्य रहाणे एक धाव करुन माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनही पाच धावांवर बाद झाला.

रोहित शर्मानं विराट कोहलीच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 48 धावांची आणि मग रिद्धिमान साहाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताच्या डावाला आकार आला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा साहा 39 धावांवर तर भुवनेश्वर कुमार आठ धावांवर खेळत होता.