गुजरातमध्ये किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट, बोटीतील सर्वजण ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 04:35 PM (IST)
अहमदाबाद : गुजरातच्या पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलाने एक संशयास्पद बोट पकडली आहे. आज सकाळी पकडलेल्या या बोटमधील 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर किनाऱ्यालगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुजरातमधील पोरबंदर किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या 'समुद्र पावक' या जहाजावरील जवानांना संशयास्पद बोट भटकताना आढळली. सुरक्षेचा उपाय म्हणून या बोटीतील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या संशयास्पद बोटीतील सर्वजण पाकिस्तानी मच्छीमार आसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसंच पुढील चौकशीसाठी त्यांना पोरबंदरला नेण्यात आलं आहे, अशी माहिती गुजरातच्या नौदलातील विंग कमांडरकडून देण्यात आली आहे.