नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकची कांस्यविजेती पैलवान साक्षी मलिकच्या प्रशिक्षकाला देण्यात आलेली बक्षिसाची रक्कम कोणी घ्यायची यावरुन वाद निर्माण झाला आहे. दहिया आणि मनदीप यांच्याप्रमाणेच आणखी दोघांनी या रकमेवर दावा केला आहे.


साक्षीने पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी तिच्या प्रशिक्षकांना दहा लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. हरियाणा सरकारच्या नियमांनुसार खेळाडूनं प्रतिज्ञापत्रात नावं दिलेल्या प्रशिक्षकांचाच पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो.

साक्षीनं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ईश्वर दहिया आणि मनदीप सिंग यांचा उल्लेख आहे. दहिया यांनी साक्षीला सुरुवातीपासून प्रशिक्षण दिलं होतं तर सध्या ती मनदीप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तर कुलदीप मलिक ब्राझिलला साक्षीसोबत गेले होते आणि राजबीर सिंग यांनी साक्षीला 2011 ते 2015 या कालावधीत प्रशिक्षण दिलं होतं. त्यामुळे त्यांनीही बक्षिसाच्या रकमेवर दावा केला आहे.