मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा कसोटी सामना उद्यापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. त्यानिमित्तानं तब्बल पाच वर्षांनी मुंबईत कसोटी क्रिकेट परतलंय. पण हा कसोटी सामना नियोजित वेळेत सुरु होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. शिवाय उद्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही पाऊस आणि ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, कानपूरच्या पहिल्या कसोटीत ब्रेक घेतलेला कर्णधार विराट कोहली मुंबईच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात परतला आहे. विराटनं आज भारतीय संघासह एमसीएच्या बीकेसीमधल्या इनडोअर अॅकॅडमीत सराव केला. भारत-न्यूझीलंड संघांमधला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळं आता वानखेडे कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहिल.


कानपूर कसोटीत खेळून भारत आणि न्यूझीलंड संघ सोमवारी मुंबईत दाखल झाले पण पावसानं दोन्ही संघांना वानखेडेवर एकही दिवस सरावाची संधी दिली नाही. टीम इंडियानं मात्र एमसीएच्या बीकेसीमधल्या इनडोअर अॅकॅडमीत सरावाची ती कसर भरून काढली आहे.


वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीच्या निमित्तानं कर्णधार विराट कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या कसोटीदरम्यान ब्रेक घेतलेल्या विराट कोहलीनं विश्रांती न घेता कसून सराव केला आहे. 2016 साली वानखेडेवर झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात विराटनं द्विशतक झळकावलं होतं. त्यामुळं वानखेडेवर विराटकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.


भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या निमित्तानं वानखेडेवर तब्बल पाच वर्षानंतर कसोटी क्रिकेट परतलं आहे. 2016 साली भारत आणि इंग्लंड संघांमधली कसोटी वानखेडेवर खेळवण्यात आली होती. पाच वर्षांनी वानखेडेवर पुन्हा कसोटी क्रिकेट पाहायला मिळणार म्हणून मुंबईकर आनंदात होते. पण कोरोनामुळं प्रेक्षक क्षमता 25 टक्क्यांवर आली आणि चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यात आता मुंबई कसोटीवर पावसाचंही सावट मुंबईकर क्रिकेट रसिकांच्या निराशेत आणखी भर पडली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :