मुंबई: विराट कोहलीची टीम इंडिया मुंबईहून दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. मुंबईवरुन पहाटे 4 च्या विमानाने भारतीय संघ दुबईला रवाना झाला. तिथून ते दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.


गेला महिनाभर लग्नाच्या धामधुमीत व्यस्त असलेला विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या एका मोठ्या सोहळ्यानंतर पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणं कठीण वाटतं की सोपं, या प्रश्नावर उत्तर देताना विराटनं आपल्या रक्तारक्तातच क्रिकेट भिनल्याचं सांगितलं.

दरम्यान, विराट कोहलीसोबत यावेळी अनुष्का शर्माही होती. अनुष्काही आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी, 6 वन डे आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. येत्या 5 जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात होईल.

क्रिकेट माझ्या रक्तात: विराट

दरम्यान, या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

क्रिकेट माझ्या रक्तातच आहे, असं सांगत विराटने कमबॅकविषयीचा प्रश्नावर षटकार ठोकला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी जिकीरीची मानली जात आहे. मात्र कर्णधार कोहली मालिकेसाठी सज्ज आहे. लग्नसोहळा हा आयुष्यातला सुंदर काळ होता. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ट्रेनिंग सुरु असल्याचं कोहली म्हणाला.

मी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी क्रिकेटपासून दूर राहिलो, पण पुन्हा क्रिकेटकडे परतणं अजिबात कठीण नाही, शेवटी क्रिकेट माझ्या नसानसात भिनलं आहे, असं विराट म्हणतो.

धवनला दुखापत

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत खेळू शकेल का, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

पहिली कसोटी पाच जानेवारीपासून सुरु होत आहे. धवनच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात घेता तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही, हे नक्की आहे.

आफ्रिकेलाही धक्का

भारताविरुद्धच्या मालिकेआधीच द. आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसीय बॉक्सिंग डे-नाईट टेस्टच्या पहिल्याच दिवशी द. आफ्रिकेचा अनुभवी विकेटकिपर क्विंटन डिकॉकला दुखापत झाली आहे. फलंदाजीवेळी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे तो नंतर विकेटकिपिंगसाठी देखील मैदानावर आला नाही.

दरम्यान, त्याची दुखापत नेमकी किती मोठी आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवस तरी त्याला मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. म्हणजेच भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीला त्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. जर त्याची दुखापत जास्त गंभीर असेल तर त्याला भारताविरुद्धच्या तीनही कसोटीतून माघार घ्यावी लागू शकते.

भारत वि दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी: 5 ते 9 जानेवारी 2018 – केपटाऊन

  • दुसरी कसोटी : 13 ते 17 जानेवारी 2018 – सेंच्युरिअन

  • तिसरी कसोटी: 24 ते 28 जानेवारी 2018 - जोहान्सबर्ग


वन डे मालिका

  • 1 फेब्रुवारी – पहिला वन डे सामना

  • 4 फेब्रुवारी – दुसरा वन डे सामना

  • 7 फेब्रुवारी – तिसरा वन डे सामना

  • 10 फेब्रुवारी – चौथा वन डे सामना

  • 13 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना

  • 16 फेब्रुवारी – सहावा वन डे सामना


टी ट्वेण्टी मालिका

  • 18 फेब्रुवारी – पहिला टी 20 सामना

  • 21 फेब्रुवारी – दुसरा टी 20 सामना

  • 24 फेब्रुवारी – तिसरा टी 20 सामना


 दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा वन डे संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर

संबंधित बातम्या

क्रिकेट माझ्या रक्तात, लग्नानंतर पहिल्या मॅचबाबत विराटचं उत्तर

 भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी शिखर धवनला दुखापत