मुंबई : चोरी केलेला माल ओएलएक्सवर विकणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत दोन मुलं आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. ही मुलं चोरी करायचे आणि त्यांची आई चोरीचा माल ओएलएक्सवर विकायची.


17 ऑगस्ट 2017 रोजी मालाडमध्ये गोकुळधाम मार्केटमधील एका मोबाईलच्या दुकानात दोन मुलं मोबाईल खरेदीसाठी आले होते. 20 हजाराचा सॅमसंगचा मोबाईल दोघांनी निवडला. मात्र, सध्या पैसे नसून बाजूच्या इमारतीत राहत असल्याचं सांगत घरातून पैसे घेऊन येण्याच्या बहाण्यानं दुकानातील एका कामगारासोबत दोघेही निघाले आणि एका इमारतीत शिरले. कामगाराला इमारतीबाहेर उभं करुन ते मोबाइल घेऊन पैसे आणण्यासाठी गेले. मात्र, दोघेही परतलेच नाही.

त्यानंतर कामगारानं घडलेला प्रकार दुकानदाराला सांगितला. याप्रकरणी दुकानदारानं पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर कुरार पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्हीच्या मदतीनं या तीनही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. जय आनंद, जीत आनंद आणि त्यांची आई उषा आनंद अशी या आरोपींची नावं आहेत.

हे दोन्ही आरोपी मोबाईल आणि इतर वस्तूंची चोरी करायचे. तर त्यांची आई घरबसल्या ओएलएक्स आणि फेसबुकसारख्या ऑनलाईन वेबसाइटवरुन या वस्तूंची विक्री करायची. अशी माहिती पोलिसांनी दिली.

आतापर्यंत या टोळीनं नेमकी कोणत्या-कोणत्या वस्तूंची चोरी केली याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या तिघांसोबत आणखीही कोणाची त्यांना साथ होती का? याचाही पोलीस तपास करत आहेत.