India Open 2022 : यंदाच्या वर्षातील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल हिला पराभवाचा धक्का बसला आहे. इंडिया ओपन (India Open 2022) स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिने सायना नेहवालचा पराभव केला आहे. 111 व्या नंबरच्या मालविका बनसोड हिने फुलराणी सायना नेहवाल हिला 17-21, 9-21 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केलं. सायनाला हा पराभवाचा मोठा धक्का मानला जात आहे.  20 वर्षीय मालविका बनसोडकडून सायना नेहवालचा अवघ्या 34 मिनिटांत पराभूत झाला.  अनेक काळ बॅटमिंटन कोर्टपासून लांब असलेल्या सायना नेहवाल हिने इंडिया ओपन (India Open 2022) स्पर्धेतून पुनरागमन केलं होतं. मात्र, दुसऱ्याच फेरीत सायनाचे आव्हान संपुष्टात आले. 


लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालनं बुधवारी इंडिया ओपन स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा स्व्हॅबिकोव्हा हिचा पराभव केला होता. तर मालविकानं पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारूकीवर मात करत दुसरी फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या फेरीत मालविका बनसोड हिने सायनाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. मालविकाविरोधात सायनाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. मालविकाने या स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल दिला. 






दरम्यान, इंडिया ओपन (India Open 2022) स्पर्धेत  स्टार शटलर पी व्ही सिंधू हिने आज विजय मिळवला आहे. सिंधूने दिसऱ्या फेरीत इरा शर्मा हिचा 21-10, 21-10 असा पराभव केला आहे. त्याशिवाय अश्मिता चालिहा हिनेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे. तिसऱ्या फेरीत पी. व्ही सिंधू आणि चालिहा यांच्यात क्वार्टर फायनलमध्ये लढत होणार आहे.  






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live