मुंबई :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सोहेल कासकरला अमेरिकन एजन्सीने नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल कासकर हा आता पाकिस्तानात परतला आहे. अमेरिकन एजन्सीने सोहेल बरोबर अटक केलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्याची तयारी करत होते. मात्र, भारतीय पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.


अलीकडेच मुंबई पोलिसांना सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानात परतल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमेरिकन एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


अली दानिश कोण आहे?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अली दानिशचे वडील दिल्लीतील जामा मशिदीत काम करायचे. त्याला दोन भाऊ आहेत, एक डॉक्टर आहे जो रशियामध्ये प्रॅक्टिस करतो आणि दुसरा भाऊ वकील आहे जो सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतो. मुंबई पोलीस सूत्रांनी सांगितले की, 2001 मध्ये दानिश दुबईला गेला आणि तिथे तो सोहेल कासकरला भेटला होता. तिथे जवळपास दोन ते तीन वर्षे हे दोघे एकत्र होते. त्यानंतर सोहलने दानिशला हिऱ्याच्या तस्करीबाबत सांगितले. त्यानंतर दानिशने रशियामध्ये जाण्याचे ठरवले कारण, तिथे हिऱ्याच्या अनेक खाणी आहेत.


दानिशने खूप प्रयत्न करुन देखील त्याला रशियाचा व्हिजा मिळत नव्हता. त्यानंतर 2003-04 ला शिक्षणाच्या नावाखाली त्याने व्हिजा काढला आणि तो रशियाला गेला. तिथे त्याने दोन वर्ष शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने हिरा व्यवसायात काम सुरू केले. त्यावेळे सोहेलला दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या तस्करीप्रकरणी अटक झाली होती. १ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा दानिस आणि सोहेल या दोघांनी मिळून शस्त्रांची तस्करी सुरू केली होती. काही दिवसांनी सोहेल आणि दानिश हे दोघे स्पेनला गेले होते. त्यानंतर हे दोघे अमेरीकन एजन्सीच्या रडारवर आले होते. 


अमेरिकन तपास यंत्रणांनी या दोघांच्या प्रत्येक बैठकीचे स्टिंग ऑपरेशन केले, जेणेकरून त्यांना अटक करण्यासाठी आवश्यक तेवढे पुरावे असतील. इतकेच नाही तर अमेरिकन एजन्सींनी त्याला या डीलसाठी पैसेही दिले होते. यानंतर, 2014 मध्ये अमेरिकन एजन्सींनी सोहेल, दानिश यांना हेरॉइन (ड्रग्ज) आणि क्षेपणास्त्र व्यवहार प्रकरणात अटक केली. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे सोपवण्यात आले होते.


सोहेलला ज्यावेळे अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्याच्याबरोबर हामिद चिस्ती, वाहब चिस्ती आणि अली दानिश यांनी देखील अटक करण्यात आली होती. 12 सप्टेंबर 2018 ला सोहेल कासकरला अमेरीकेच्या फेडरल कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्यानंतर चौकशीसाठी कासरकर भारताकडे सोपवण्याची तयारी सुरू होती. कारण सोहेल कासकरकडे भारतीय पासपोर्ट मिळाला होता. भारत आणि अमेरिका यांच्यात 2005 मध्ये परस्पर कायदेशीर सहाय्यक करारावर स्वाक्षरी झाली होती. ज्याच्या आधारे सोहेलला भारतात आणले जाणार होते.  सोहेल कासकरला जर भारतात आणले असते तर तर मुंबई पोलिसांना दाऊदबद्दल अधिकची माहिती मिळाली असती. पण सोहेल काही भारतीयांच्या हाताला लागला नाही. तो अखेर पाकिस्तानात गेला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: