Asian Games 2023 Hockey :  भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला झंझावत कायम राखला आहे. आज बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील गट 'अ' च्या सामन्यात बांगलादेशचा 12-0 असा धुव्वा उडवला आहे. 
 
भारतीय संघाने गट 'अ' मध्ये अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने गटातील पाचही सामन्यांमध्ये 58 गोल केले आणि केवळ पाच गोल स्वीकारले. यापूर्वीच्या सामन्यात भारतीय संघाने उझबेकिस्तानचा 16-0, सिंगापूरचा 16-1, पाकिस्तानचा 10-2 आणि जपानचा 4-2 असा पराभव केला होता. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत (दुसरे, चौथे आणि 32वे मिनिट) आणि मनदीप सिंग (18वे, 24वे आणि 46वे मिनिट) यांनी तीन गोल केले.


तर, अभिषेक (41 आणि 57 मिनिटे) दोन गोल डागले. तर, अमित रोहिदास (28 मिनिट) ललित उपाध्याय (23 मिनिट), गुरजंत सिंग (56 मिनिट) आणि नीलकांता शर्मा (47) यांनी प्रत्येकी एक गोल केला. बांगलादेशचा संघ भारतीय संघाविरोधात निष्प्रभ ठरला.  त्यांना भारताविरोधात एकही गोल करता आला नाही. 


भारताने संपूर्ण सामन्यात सतत आक्रमण केले आणि दोन्ही हाफमध्ये प्रत्येकी सहा गोल केले. सामन्याच्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने दुसऱ्याच मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर कर्णधाराने आणखी एक पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. युवा अभिषेक आणि मनदीप यांनी मिळून मैदानी गोल केले. अभिषेकनेही मनदीप आणि ललित यांच्या गोलला मदत केली. त्यानंतर भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला.


हरमनप्रीतचा हा प्रयत्न बांगलादेशचा गोलरक्षक मोहम्मद नॉयनने रोखला पण मनदीपने रिबाऊंडवर गोल केला. रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्याने भारत हाफ टाईमपर्यंत 6-0 ने आघाडीवर होता. उत्तरार्धात भारताला सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर अभिषेकने रिव्हर्स हिटने गोल केला तर मनदीप आणि अभिषेकने शानदार चाली करत भारताला 9-0 ने पुढे नेले. नीलकांताने एका मिनिटानंतर रिबाऊंडवर गोल केला. गुरजंत आणि अभिषेक यांनी शेवटच्या पाच मिनिटांत आणखी दोन गोल करून भारताचा 12-0 असा विजय निश्चित केला.


इतर संबंधित बातमी :