लखनौ : रोहित शर्माच्या नाबाद शतकामुळे लखनौच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीमध्ये वेस्ट इंडिज संघासमोर 196 धावांचं लक्ष्य आहे. टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 20 षटकांत दोन बाद 195 धावांचा डोंगर उभारला. रोहितने ट्वेन्टी ट्वेन्टीतलं विक्रमी चौथं शतक झळकावताना 61 चेंडूंत नाबाद 111 धावांची खेळी केली.
रोहित शर्माच्या शतकी खेळीला आठ चौकार आणि सात षटकारांचा साज होता. रोहितचं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला.
रोहितने शिखर धवनच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी विंडीज गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. धवनने 41 चेंडूंत 43 धावांची खेळी उभारली.
टीम इंडियाने कोलकात्याचा टी20 सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता लखनौचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे.