उस्मानाबाद : दुष्काळी मदत निधीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 7 हजार कोटींची मागणी केली आहे. उस्मानाबादेत दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. दुष्काळग्रस्त भागात झालेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्था यावरही स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.

दोन पावसातील कालावधी आणि पावसाचे प्रमाण याची तुलना करता पैशेवारी पन्नास टक्क्यांच्या आत आल्याने उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा आणि दुष्काळी लाभ दिले जातील असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं. ज्वारीमध्ये 50 टक्के, मका 60 टक्के तर सोयाबीनमध्ये 60 टक्क्यांची घट आली आहे. तसंच तूर आणि कापूस पिकांमध्ये 50 टक्के घट झाली आहे. रब्बीच्या संदर्भात केवळ 25 टक्के पेरा झाला आहे. दुष्काळी उपाययोजना लागू केल्या आहेत. पाणी चारा नियोजन मोठ्या प्रमाणात करीत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.