Ind vs Ban: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अगदी टी-20 सामन्याची आठवण यावी असाच खेळ पाहायला मिळाला. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने आज चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ मैदानावर उतरला असता 233 धावांत गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं. भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) पहिल्या 3 षटकामध्येच 51 धावांची तुफानी फलंदाजी करत टी-20 सामन्यांची आठवण करुन दिली. केवळ 12 षटकांत भारतीय संघाने या 121 धावा केल्या होत्या.


भारतीय संघातील सलामीच्या फलंदाजींनी केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे टीम इंडियाने 285 धावांत डाव घोषित केला. त्यामुळे, दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताला 52 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 72 धावा केल्या असून केएल राहुलने 43 चेंडूत 68 धावा केल्या. विराट कोहलीचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र, त्याने आपल्या 27000 धावा पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे. विराटने आज 35 चेंडूत 47 धावा केल्या. विशेष म्हणजे भारतीय संघाचने केवळ 34.4 षटकांत 9 गड्यांच्या मोदबल्यात 285 धावा करुन 52 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाची फलंदाजी म्हणजे टी-20 किंवा एकदिवसीय सामन्यांची आठवण करुन देणारीच ठरली. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 4-4 गडी बाद केले. 


बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना असून दुसऱ्या सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने झटपट फलंदाजी करत 285 धावांवर डाव घोषित केला. विशेष म्हणजे आजच्या दिवसातील 19 षटकांचा खेळ बाकी असतानाच टीम इंडियाचे हा धाडसी निर्णय घेत बांगलादेशला फलंदाजीसाठी मैदानावर धाडले. तर, बांगलादेशने 10 षटकांतच 2 गडी गमावले आहेत. 


बांगलादेशचे 2 गडी बाद


बांगलादेशच्या हसन मोहम्मद महजने 4 धावा केल्या असून रविचंद्रन अश्विनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तत्पूर्वी जाकिर हसनला बाद करण्यातही आश्विनला यश आलं होत. जाकिरने 10 धावा केल्या. त्यामुळे, भारताने डाव घोषित केल्यानंतर 26 धावांत बांगलादेशचे 2 गडी बाद झाले आहेत. दरम्यान, आजचा खेळ संपल्यानंतर उद्या सामन्यातील शेवटचा दिवस असणार आहे. शेवटच्या दिवशी 95 षटकाचा खेळ होणार आहे. 


हेही वाचा


रोहित, यशस्वीकडून षटकार-चौकारांचा पाऊस; बांगलादेशचा कर्णधार चेंडू घेऊन थेट अम्पायरकडे धावला, Video


बांगलादेशचा डाव 233 धावांवर गुंडाळला; रवींद्र जडेजाने विक्रम रचला, भारत ताबडतोब फलंदाजी करण्याच्या तयारीत