मुंबई : इंग्लंडमधील आगामी विश्वचषक हा आजवरचा सर्वात आव्हानात्मक विश्वचषक असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली आहे. येत्या 30 मे ते 14 जुलै या कालावधीत या विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. कसोटी दर्जा लाभलेल्या बारापैकी केवळ दहा संघांचा या विश्वचषकात सहभाग असून, त्या दहाही संघांना प्राथमिक साखळीत एकमेकांशी एकेकदा खेळायचं आहे. 1992 सालचा ऑस्ट्रेलियातला विश्वचषक याच फॉरमॅटनं खेळवण्यात आला होता.
तुल्यबळ प्रतिस्पर्धी आणि प्राथमिक साखळीचा फॉरमॅट लक्षात घेता आगामी विश्वचषक हा आजवरचा सर्वात आव्हानात्मक विश्वचषक ठरणार असल्याची प्रतिक्रिया भारतीय कर्णधारानं व्यक्त केली आहे.
विराट कोहलीच्या कारकीर्दीतला हा तिसरा विश्वचषक आहे. पण आधीच्या दोन विश्वचषकांच्या तुलनेत यंदाचा विश्वचषक खूपच वेगळा आहे. कारण या विश्वचषकातले दहाही संघ तुल्यबळ आहेत, याकडे लक्ष वेधून विराट म्हणाला की, 2015 सालचा अफगाणिस्तान संघ आणि 2019 सालचा अफगाणिस्तान संघ यांत जमीनअस्मानाचा फरक आहे. आजचा कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. त्यामुळं आम्ही कुणालाही कमी लेखणार नाही. सातत्यानं सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा आमचा प्रयत्न राहिल. प्रत्येक सामन्यात तुम्हाला पूर्ण क्षमतेनं खेळ करावा लागेल. कारण या विश्वचषकात चार संघांचा एक गट असा फॉरमॅट नाही. प्रत्येक संघाला साखळीत प्रत्येक संघाशी एकदा खेळण्याची संधी मिळणार आहे. ही बाब साऱ्याच संघांच्या फायद्याची आहे. पण त्यामुळं विश्वचषकाचा फॉरमॅट खूपच आव्हानात्मकही बनला आहे.
आगामी विश्वचषकात पहिल्या चेंडूपासून निकरानं खेळ करणारा संघच बाजी मारण्याची अधिक शक्यता आहे, असंही विराटनं म्हटलं आहे. टीम इंडियाच्या शिलेदारांना या विश्वचषकात मोकळा श्वास घेण्याचीही संधी मिळणार नसल्याचं विराटनं सामन्यांच्या वेळापत्रकाकडे बोट दाखवून म्हटलं आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना पाच जूनला दक्षिण आफ्रिकेशी आहे. त्यानंतर बारा दिवसांत भारतीय संघ आणखी तीन आव्हानांना सामोरा जाणार आहे. त्यात टीम इंडिया नऊ जूनला ऑस्ट्रेलियाशी, 13 जूनला न्यूझीलंडशी आणि 16 जूनला पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
विश्वचषकाच्या सुरुवातीलाच चार मोठ्या संघांचा मुकाबला करण्याची मिळालेली संधी टीम इंडियाला पुढच्या वाटचालीसाठी फायद्याची ठरणार असल्याचंही मत भारतीय कर्णधारानं व्यक्त केलं. पहिल्या चार सामन्यांचं आव्हान लक्षात घेता भारतीय शिलेदारांना पहिल्या चेंडूपासूनच निकरानं खेळ करावा लागेल. तुम्हाला एखाददुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी बजावून समाधानी राहता येणार नाही. तुम्हाला पहिल्या चेंडूपासून फायनलच्या अखेरच्या चेंडूपर्यंत सारख्याच तीव्रतेनं खेळावं लागणार आहे आणि हेच या विश्वचषकाचं वैशिष्ट्य आहे, असं मत विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे.
यंदाच्या विश्वचषकाचं आव्हान किती मोठं असतं, याची कल्पना देण्यासाठी विराट कोहलीनं युरोपातल्या इंग्लिश प्रीमियर लीग आणि ला लीगासारख्या फुटबॉल लीग्सचं उदाहरण दिलं. या लीग्समध्ये खेळत असलेल्या क्लब्सना आपल्या खेळातली तीव्रता आणि खेळातलं सातत्य तीनचार महिने टिकवून ठेवावं लागतं. आमचीही सुरुवात चांगली झाली, तर त्याच सातत्यानं आम्ही फायनलपर्यंत खेळण्याचा निकरानं प्रयत्न करू, असंही विराट म्हणाला.
विश्वचषकात धावसंख्येचे डोंगर
पाकिस्तान संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या वन डे सामन्यांमध्ये सध्या तीनशेपेक्षा अधिक धावांचे डोंगर पाहायला मिळत आहेत. पण विश्वचषकात हा ट्रेण्ड बदलूही शकतो, असं विराट कोहलीनं म्हटलं आहे. इंग्लंडमध्ये सध्या उन्हाळा आहे, याकडे लक्ष वेधून तो म्हणाला की, विश्वचषकाच्या सामन्यांसाठीही फलंदाजांना अनुकूल वातावरण आणि खेळपट्ट्या असण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे विश्वचषकातही मोठ्या धावांचे डोंगर उभे राहू शकतात. पण दोन संघांमधल्या वन डे सामन्यांची विश्वचषकाशी तुलना करता येणार नाही. त्यात कमालीचा फरक असतो.
विश्वचषकात 260-270 धावांचे सामनेही पाहायला मिळू शकतात. त्या धावसंख्येचं आव्हान देऊन विश्वचषकात सामने जिंकलेले पाहायला मिळतील. त्याचं कारण आहे विश्वचषक सामन्यांमधलं दडपण. तिथलं वातावरण दोन संघांमधल्या नेहमीच्या सामन्यांपेक्षा खूप वेगळं असतं. त्यामुळे विश्वचषकात धावसंख्येच्या आव्हानापेक्षा विश्वचषकाच्या दडपणाचं आव्हान मोठं असतं, असं विराटनं म्हटलं आहे.
इंग्लंडला लवकर पोहोचणं फायद्याचं?
टीम इंडियाचा आगामी विश्वचषकातला सलामीचा सामना पाच जूनला आहे. पण विराट कोहली आणि त्याचे शिलेदार पंधरा दिवसआधीच इंग्लंडमध्ये दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, विश्वचषकासारख्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्याआधी विशिष्ट मुदतीत यजमान देशात पोहोचणं आपल्या फायद्याचं असतं. स्पर्धेच्या ठिकाणी योग्य वेळेत दाखल झाल्यानं तुम्हाला तिथल्या वातावरणात रुळण्यासाठी, तिथल्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे संघाला एकसंध होण्याची संधी मिळते, संघावरचा दडपणाचा भारही हलका होऊ शकतो.
भारताचं आक्रमण सज्ज
टीम इंडियाचं आक्रमण विश्वचषकासाठी सज्ज असल्याचा विश्वासही विराट कोहलीनं बोलून दाखवला. भारताच्या विश्वचषक संघातले गोलंदाज आयपीएलमध्ये खेळतानाही वन डे क्रिकेटच्या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी करत होते. भारतीय संघातल्या प्रत्येक गोलंदाजाला तुम्ही आयपीएलमध्ये खेळताना पाहिलं. त्यापैकी कुणाचीही चार षटकांत दमछाक झाल्याचं दिसलं नाही. ते ताजेतवाने दिसत होते. आपल्याला वन डे सामन्यांच्या विश्वचषकाच्या आव्हानाला सामोरं जायचं आहे, हीच आयपीएलमध्ये खेळताना त्यांची मानसिकता होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी वन डे सामन्यांच्या दृष्टीनं फिटनेस राखला होता.
‘आयपीएलनं खूप शिकवलं’
आयपीएलच्या रणांगणात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पहिल्या सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली होती. एक कर्णधार म्हणून त्या पराभवांनी आपल्याला खूप काही शिकवलं, असं विराटनं म्हटलं आहे. पहिल्या सहा सामन्यांमधल्या पराभवांनी पुढच्या प्रत्येक सामन्यात आम्ही विजय अनिवार्य ठरला होता. त्यामुळे तुम्हाला पुढच्या काही दिवसांत आपण जिंकलो नाही तर किंवा आता काय करायचं, असा विचार करता येत नाही. तुम्हाला सामन्याच्या दिवशी मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी बजावायची असते.