मुंबई : आमदारांनी चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी आमदार निधीतून खर्च करण्याचा जीआर आम्ही बुधवारी काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


राज्यात 151 तालुके, 268 मंडळामध्ये दुष्काळ आहे. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट देऊन आढावा घेणार आहेत. 366 कोटी पाणी टंचाईसाठी तर 400 कोटी चारा टंचाईवर मात करण्यासाठी दिले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दुष्काळावर मात करण्यासाठी आठ हजार कोटींची तरतूद आम्ही केली आहे. आकस्मिक निधी वापरू पण पाणी टंचाईचा सामना करू, असेही ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागात आमदार निधी खर्च करण्याबाबत आम्ही उद्या जीआर काढणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी रोजगार मागणाऱ्यांना ताबडतोब रोजगार देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सीईओ यांना दिले आहेत. जे अधिकारी हयगय करतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असेही ते म्हणाले.  14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 2/3 रुपये किलोने रेशन देण्यासाठी साडे आठशे कोटींची तरतूद केली आहे. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा फायदा दिला जाईल. यासाठी आम्ही चार हजार कोटींची तरतूद केली आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले आहेत, अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

विधानसभेच्या तोंडावर नाही तर गेल्या पाच वर्षात आम्ही सतत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमुक्तीनंतर काही तांत्रिक कारणांमुळे लक्षात आलं की हजारो शेतकऱ्यांची अजूनही कर्जमुक्ती झालेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही तालुका स्तरावर समित्या तयार केल्या होत्या. त्यांनी तयार केलेल्या याद्या आता राज्य सरकारकडे आल्या आहेत. या सर्व याद्यांना मंजुरी देत शेतकाऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहोत, अशी माहिती देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

भाजपने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आजच्या बैठकीत आढावा घेतला. निवडणुकीत भाजपला मोठं यश येईल असं वातावरण आहे, असेही ते म्हणाले.