एक्स्प्लोर
ICC World Cup 2019 | INDvsAUS | टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हीच विजयी लय कायम राखण्यासाठी भारतीय संघ आतुर असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. या पूर्वीच्या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असल्याने भारतापुढे हे कडवे आव्हान असणार आहे. मी नाणेफेक जिंकली असती, तर मी देखील फलंदाजीलाच प्राधान्य दिले असते, असे यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच यावेळी म्हणाला. ऑस्ट्रेलियानं भारत दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवरून 3-2 असा सनसनाटी विजय साजरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला विश्वचषकाचा सामना अतिशय चुरशीचा होण्याची चिन्हं आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजवर 136 सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया संघ नेहमीच वरचढ राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 77 सामन्यात तर भारताने 49 सामन्यात विजय साकारला आहे. विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया 11 सामन्यात आमनेसामने आले असून ऑस्ट्रेलियाने 8 तर भारताने केवळ तीनदा विजय मिळवला आहे. विश्वचषकात देखील नेहमीच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले आहे. मात्र या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ सध्या डळमळीत अवस्थेत आहे. असे असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा पेपर म्हणावा तितका सोपा नाही. कारण ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात केली. रोहितच्या शतकामुळे भारताने आफ्रिकेचे 228 धावांचे लक्ष्य पार केले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























