लॉर्ड्स : ऐतिहासिक, अविश्वसनीय, अद्भुत असंच वर्णन आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचं करता येईल. इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला. शेवटच्या षटकात सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं. क्रिकेटच्या जन्मदात्याचा अर्थात इंग्लंडचा हा पहिलाच विश्वचषक किताब आहे.


सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.

स्टोक्सची मोलाची कामगिरी
इंग्लंडच्या पहिल्या विश्वचषक विजयात बेन स्टोक्सने सर्वात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्याला फायनलमधल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. स्टोक्सने 98 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी उभारली. त्याने जोस बटलरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचून इंग्लंडला पराभवाच्या संकटातून बाहेर काढलं. मग स्टोक्सनेच तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन इंग्लंडला पन्नासाव्या षटकात फायनल टाय करुन दिली. मग सुपर ओव्हरमध्ये स्टोक्सने नाबाद आठ धावांची खेळी केली. त्याने फायनलमध्ये एकदाही बाद न होता केलेल्या 92 धावा इंग्लंडच्या विश्वचषक विजयात निर्णायक ठरल्या.

23 वर्षांनी क्रिकेटविश्वात नवा विजेता
दरम्यान इंग्लंडच्या रुपात क्रिकेट जगताला 23 वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. 1996 मध्ये श्रीलंका विश्वविजेता बनल्यानंतर क्रिकेटविश्वाला इंग्लंडच्या रुपात नवा विजेता मिळाला. याआधी 1999, 2003 आणि 2007 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. तर 2011 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. ऑस्ट्रेलियाने यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि 2015 च्या विजेतेपदावर नाव कोरलं. अशाप्रकारे 1999 आणि 2015 पर्यंत क्रिकेटविश्वाला ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या रुपातच चॅम्पियन मिळाला होता, पण आता 23 वर्षांनी इंग्लंडचा संघ क्रिकेटचा बादशाह बनला आहे.

या तीन विश्वचषकात विजेतेपदाची हुलकावणी
याआधीही इग्लंडला विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली होती. 1979, 1987 आणि 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये क्रिकेटच्या जन्मदात्याला नशिबाची साथ मिळाली नव्हती. इंग्लंडला 1979 च्या विश्वचषक फायनलमध्ये वेस्ट इंडीज, 1987 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानने पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.1992 च्या विश्वचषकानंतर इंग्लंडची गाडी जणू रुळावरुन उतरली. इंग्लंडला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी 27 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. 2019 च्या विश्वचषकात 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्लंडने केवळ सेमीफायनल आणि फायनलमध्ये जागा मिळवली नाही, तर विश्वचषक जिंकून इतिहास रचला.

आतापर्यंतचे विश्वविजेते
1975 : वेस्ट इंडीज (ऑस्ट्रेलियाचा पराभव)
1979 : वेस्ट इंडीज (इंग्लंडचा पराभव)
1983 : भारत (वेस्ट इंडीजचा पराभव)
1987 : ऑस्ट्रेलिया (इंग्लंडचा पराभव)
1992 : पाकिस्तान (इंग्लंडचा पराभव)
1996 : श्रीलंका (ऑस्ट्रेलियाचा पराभव)
1999 : ऑस्ट्रेलिया (पाकिस्तानचा पराभव)
2003 : ऑस्ट्रेलिया (भारताच पराभव)
2007 : ऑस्ट्रेलिया (श्रीलंकेचा पराभव)
2011 : भारत (श्रीलंकेचा पराभव)
2015 : ऑस्ट्रेलिया (न्यूझीलंडचा पराभव)
2019 : इंग्लंड (न्यूझीलंडचा पराभव)