ICC T20I Rankings : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आघाडीचा फलंदाज केएल राहुल यांनी टी-20 आयसीसी क्रमवारीत आपले टॉप टेन मधील स्थान कायम ठेवलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टी-20 आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानी तर केएल राहुल सहाव्या स्थानी आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील रविवारी झालेल्या सामन्यात 22 धावांच्या बदल्यात चार विकेट्स पटकवणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भूवनेश्वर कुमार आता गोलंदाजांच्या यादीत 16 व्या स्थानी आहे
भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने आयसीसी क्रमवारीत 10 स्थानांनी वरती झेप घेतली असून तो आता 21 व्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा हा आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माची टी-20 क्रमवारीत घसरण झाली असून तो 14 व्या स्थानी पोहोचला आहे तर शिखर धवन 29 व्या स्थानावर आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील भारतीय संघात विराट कोहली आणि केएल राहुल हे दोन्ही खेळाडू नाहीत.
एकदिवसीय सामन्यातील क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ट्रेन्ट बोल्टने पहिला क्रमांक पटकावला आहे तर टॉप टेनमध्ये जरप्रित बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज असून तो सातव्या क्रमांकावर आहे. अष्ठपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जडेजा हा नवव्या क्रमांकावर आहे.