नवी दिल्ली : क्रिकेट हा एक असा खेळ आहे, ज्या खेळामुळं जगातील कित्येक देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. फक्त वैश्विक स्तरावरच नव्हे, तर भारतातही क्रिकेटबाबतचं कुतूहल आणि उत्सुकता ही अतुलनीय. क्रिकेटचा उल्लेख आला की, ओघाओघानं त्याच्याशी संबंधीत गोष्टींचीही चर्चा होते. अशीच चर्चा सध्या सोशल मीडियापासून संपूर्ण क्रीडा वर्तुळात सुरु आहे. ही चर्चा आहे एका क्रिकेट स्टेडियमबाबतची.


क्रिकेटचं मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असतं जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदानं आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावं. तिथं क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सलाही विसरुन चालणार नाही. आता याच यादीमध्ये समावेश होणार आहे तो म्हणजे (Balochistan) बलुचिस्तानमधील अतिशय सुरेख असं गवादर क्रिकेट स्टेडियम.


सोशल मीडियावर Fakhr-e-Alam या ट्विटर अकाऊंवरुन या क्रिकेट स्टेडियमचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. ज्यामघ्ये अतिशय रुक्ष पण त्यातही निसर्गसौंदर्याची वेगळी परिभाषा मांडणाऱ्या एका स्थळाबाबतची माहिती मिळत आहे. ओसाड आणि निर्मनुष्य पर्वतरांगांमध्ये साकारण्यात आलेलं गवादर क्रिकेट स्टेडियम हे सध्याच्या घडीला अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.


आयसीसीनंही ट्विटरवरुन या स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. याहून अधिक सुंदर अशा क्रिकेट स्टेडियमचे फोटो दाखवा, आम्ही वाट पाहतोय.... असं आयसीसीनं फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं. हे फोटो पाहता कॅप्शन नेमकं अशा पद्धतीनं का लिहिण्यात आलं आहे, याचा सहजच अंदाज येत आहे.











खडकाळ पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार गालीचाप्रमाणं हे स्टेडियम बलुचिस्तानमध्ये क्रिकेट खेळाडूंच्या प्रतिक्षेत सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरैज शम्सी यानंही या स्टेडियमचं सौंदर्य पाहून अवाक् झाल्याची प्रतिक्रिया दिली. या सुरेख स्थळावर आपण तिसरा टी20 सामना आयोजित करु शकतो का, असा प्रश्न करत त्यानं न्यूलँड्स, धरमशाला आणि गवादर स्टेडियम ही आपली सर्वात आवडीची क्रिकेट मैदानं असल्याचं सांगितलं.