Jalna Ram Mandir Theft: जालना जिल्ह्यातील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणातील मुख्य आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागला असून, आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक येथील बिदरमधून या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पोलिसांनी या चोरट्यांकडून आणखी चार मोठ्या आणि एक छोटी मूर्ती हस्तगत केली आहे. र यात आणखी एका आरोपीचे नाव समोर येत असून, त्याचा देखील पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


याप्रकरणी जालना पोलिसांनी काल शेख राजू शेख हुसेन (रा. कर्नाटक, ह. मु. उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, हनुमानाच्या दोन अशा एकूण पाच रामपंचायतन मूर्ती जप्त केल्या होत्या. दरम्यान याप्रकरणी मुख्य आरोपी फरार होता. मात्र जालना पोलिसांनी आज पुन्हा कारवाई करत मुख्य आरोपी शेख जिलानी याच्यासह एकाला अटक केली आहे.  कर्नाटकमधील बिदरमधून जिलानीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याच्या ताब्यातून चार मोठ्या आणि एक छोटी मूर्ती जप्त करण्यात आली आहे. 


आणखी एक आरोपी फरार...


शुक्रवारी पोलिसांनी आधी दोन जणांना ताब्यात घेतले होते. त्या दोघांची चौकशी केली असता, शेख जिलानी मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी जिलानी याला ताब्यात घेतले असता, आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. त्यामुळे त्या दोघांना जालना पोलिसांनी कर्नाटकमधील बिदरमधून ताब्यात घेतले. पण त्या दोघांच्या चौकशीत आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता पोलीस पाचव्या आरोपीचा देखील शोध घेत असून, लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


66 दिवसांनी सापडले आरोपी...


समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी झाल्याच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. जालना पोलिसांवर आरोपी पकडण्यासाठी मोठा दबाव होता. विशेष म्हणजे विधानसभेत देखील या घटनेतील आरोपी पकडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अखेर 66 दिवसांनी पोलिसांना या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. 


मंदिर विश्वस्तांकडून पोलिसांचा सत्कार


जालना जिल्ह्यातील समर्थांच्या देवघरातील देव पळवणाऱ्या चोरांचा पोलिसांनी पर्दाफाश करून, सर्व मूर्ती हस्तगत केल्याने भाविक आणि ग्रामस्थां मध्ये आनंद पसरला आहे.  आज मंदिर विश्वस्त भूषणस्वामी महाराज आणि गावकऱ्यांनी मिळून पोलीस अधीक्षक आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. पोलिसांनी लावलेल्या तापासबाबत आभार मानत शाल श्रीफळ देऊन त्यांचे मंदिर संस्थानाच्यावतीने आभार मानले. दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर भव्य कार्यक्रमाचे नियोजन करून, पुन्हा मूर्तींची प्रतिष्ठापना करणार असल्याच मंदिर विश्वस्तांनी सांगितले