बंगळूर : आज विश्वचषकात न्यूझीलंडसमोर श्रीलंकेचे आव्हान आहे. बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्याचबरोबर हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल. वास्तविक, न्यूझीलंडचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत, किवी संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय पाकिस्तानचेही 8 सामन्यांत 8 गुण आहेत, पण किवी संघ बाबर आझमच्या संघापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे वर आहे.






श्रीलंकेचा डाव कोलमडला 


न्यूझीलंडने आज श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत श्रीलंकेला फलंदाजीला खिंडार पाडले. सलामीवीर कुसल परेराच्या वेगवान 51 धावा वगळता एकही फलंदाज तग धरु शकला नाही. चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 25 षटकात 8 बाद 114 अशी झाली आहे. बोल्टने तीन विकेट घेतल्या, तर फर्ग्युसन आणि मिशेल सँटनेरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. साऊथीने एक विकेट घेतली. 






न्यूझीलंडचा पराभव पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा?


आज जर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेचा पराभव करण्यात यशस्वी ठरला तर पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल का? असे झाल्यास पाकिस्तानला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, जेणेकरून निव्वळ धावगती न्यूझीलंडपेक्षा चांगली होऊ शकेल. पाकिस्तानचा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे. इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल. याच कारणामुळे श्रीलंकेने आज न्यूझीलंडला पराभूत करावे अशी प्रार्थना पाकिस्तान संघ करेल. आज जर न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाला तर पाकिस्तानला फक्त इंग्लंडविरुद्धच्या विजयाची गरज आहे, तेव्हा नेट रनरेटचा मुद्दा राहणार नाही.






न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या नेट रन रेटमध्ये काय फरक आहे?


न्यूझीलंडचा रन रेट +0.398 आहे. तर पाकिस्तानचा रन रेट +0.036 आहे. मात्र, दोन्ही संघांचे 8-8 गुण आहेत. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. या चौथ्या संघासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तानशिवाय अफगाणिस्तानचा दावेदार आहे. या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडशिवाय बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँडचा प्रवास संपला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या