South Africa vs Netherlands : वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला दणका देत स्पर्धेच्या इतिहासातील पहिलावहिला व विजय मिळवला. हा विजय स्मरणात असतानाच वर्ल्डकपमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला मात स्पर्धेतील दुसऱ्या सनसनाटी विजयाची नोंद केली. ही कामगिरी नेदरलँडच्या ऑरेंज आर्मीने दुसऱ्यांदा करून दाखवली आहे. यापूर्वी, गेल्यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही त्यांनी दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिला होता. त्यामुळे सलग दोन वर्ल्डकपमध्ये ऑरेंज आर्मीच्या तडाख्यात चोकर्सचा शिक्का बसलेली साऊथ आफ्रिकन टीम सापडली. 






विश्वचषकाच्या इतिहासात नेदरलँड्सचा हा तिसरा विजय 


वर्ल्डकप 2023 मध्ये भारतात तीन दिवसांत दोन मोठे अपसेट झाले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. मंगळवारी (17 ऑक्टोबर) नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात नेदरलँड्सचा हा तिसरा विजय आहे. त्याने यापूर्वी नामिबिया (2003) आणि स्कॉटलंड (2007) यांचा पराभव केला आहे. आता या संघाने आफ्रिकन संघालाही दणदणीत पराभव दिला आहे. विश्वचषकात नेदरलँड्सने एकूण 23 सामने खेळले, त्यापैकी 3 सामने जिंकले. चालू विश्वचषकात नेदरलँडचा 3 सामन्यांतील हा पहिला विजय आहे. याआधी पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर या पराभवाने दक्षिण आफ्रिका संघाचा विजय रथ थांबला आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.






खराब कामगिरीचा फटका


पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे हा सामना 43 षटकांचा खेळवण्यात आला. यानंतर नेदरलँड्सने सामन्यात 8 गडी गमावून 245 धावा केल्या आणि आफ्रिकन संघासमोर 246 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 42.5 षटकांत 207 धावांवरच आटोपला. या सामन्यात एके काळी दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप कमांडिंग पोझिशनमध्ये असल्याचं दिसत होतं, या मॅचमध्ये विजय निश्चित असल्याचं दिसत होतं. पण सामन्यात झेल सोडले, खराब क्षेत्ररक्षण केले आणि अनेक अतिरिक्त धावा दिल्या. बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने 32 एक्स्ट्रा (21 वाईड, 1 नो बॉल, 10 लेग बाय) दिले. एकवेळ नेदरलँड्स संघ 112/6 (27 षटके) होता. पण पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात धावसंख्या 245/8 (43 षटके) झाली. दक्षिण आफ्रिकेचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा 207 धावांवर गारद झाला. या स्पर्धेत आतापर्यंत 'बाहुबली' म्हणून खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ नेदरलँडसारख्या संघापुढे आपले सर्व वैभव गमावून बसला. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाने या स्पर्धेत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्या कामगिरीनंतर ते नेदरलँड्ससारख्या संघाकडून पराभूत होतील, अशी अपेक्षाही नव्हती. 


इतर महत्वाच्या बातम्या