World Cup 2023, SA vs NED : यंदाच्या विश्वचषकातील दुसरा मोठा उलटफेर झाला आहे. दुबळ्या नेदरलँडने बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तान संघाने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला होता. आज नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. याआधी 2022 च्या टी 20 विश्वचषकात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. आता आणखी एकदा दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा तीन सामन्यातील पहिला पराभव होय. यंदाच्या विश्वचषकातील नेदरलँडचा हा पहिला विजय होय. याआधी त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.  


नेदरलँडने दिलेल्या 246 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांपर्यंत मजल मारु शकला.


नेदरलँडने दिलेल्या 246 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. 44 धावांत आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक, कर्णधार तेम्बा बवुमा, राशी वॅन दुसेन आणि मार्करम यांना मोठी खेळी करता आली नाही. तेम्बा बवुमा याने 31 चेंडूत 16 धावांची खेळी केली. क्विंटन डि कॉक याने 22 चेंडूत 20 धावांची खेळी केली. दुसेन याला फक्त चार धावांचे योगदान देता आले. तर मार्करम फक्त एक धाव काढून बाद झाला. 


चार विकेट झटपट गमावल्यानंतर क्लासेन आणि डेविड मिलर यांनी डाव संभाळण्याचा प्रयत्न केला.दोघांमध्ये 40 धावांची भागिदारीही झाली होती. पण क्लासेन चुकीचा फटका मारुन बाद झाला. क्लासेन याने 28 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. क्लासेन बाद झाल्यानंतर मार्को जानसनही फारकाळ तग धरु शकला नाही. मार्को 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेविड मिलरही तंबूत परतला. मिलर 52 चेंडूत 43 धावांचे योगदान देऊ शकला. मिलरने आपल्या खेळीत एक षटकार आणि 4 चौकार ठोकले. मिलर बाद झाल्यानेतर Gerald Coetzee याने संघर्ष केला. पण तोही 23 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावांचे योगदान देऊ शकला. कगिसो रबाडा याने 6 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 9 धावा चोपल्या. केशव महाराज याने अखेरीस धावांचा पाऊस पाडला. पण तोपर्यंत वेळ निधून गेली होती.  


नेदरलँडच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एकाही मोठी भागिदारी करु दिली नाही. डेविड मिलर आणि क्लासेन यांनी सर्वाधिक 45 धावांची भागिदारी केली. बवुमा आणि डिकॉक यांच्यामध्ये 36 धावांची भागिदारी झाली होती. मिलर आणि Gerald Coetzee  यांनी 36 धावांची भागिदारी केली. पण एकाही जोडीला अर्धशतकी भागिदारी करता आली नाही. अखेरीस केशव महाराज याने 40 धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकला.


नेदरलँडकडून लोगन वॅन बीक, पौल वॅन मैरकीन,  वॅन डर मॅरवौ आणि बास डे लीडे यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.