भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय ठरला. भारताने अफगाणिस्तानसमोर 225 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने एकाकी झुंज दिली. नाबीने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. परंतु भारतीय गोलंदाजांनी नाबीव्यतिरिक्त कोणत्याही अफगाणी खेळाडूला फार वेळ मैदानावर उभे राहू दिले नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे भारताने हा सामना खिशात घातला.
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या आक्रमक वृत्तीचा चांगलाच फटका बसला. अफगाणिस्तानच्या डावात जसप्रीत बुमराहचा चेंडू फलंदाज रहमत शाहच्या पॅडवर आदळला. त्यावेळी बुमराह आणि कोहलीने पायचीतचे जोरदार अपील केले. परंतु पंच अलीम डार यांनी फलंदाज नाबाद असल्याचा कौल दिला.
यावेळी कर्णधार विराटने अतिशय आक्रमकपणे केलेल्या अपिलवर पंचांनी हरकत घेतली. विराटच्या आक्रमक अपिलनंतरही डार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान विराट अपिल करतच राहिला. त्यामुळे आयसीसीच्या आचारसंहिता नियमाचा भंग केल्याप्रकरणी विराटला त्याच्या मानधनाच्या पंचवीस टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
विश्वचषकासाठी विराटच्या किटमध्ये तीन नवीन बॅट्स | खेळ माझा | ABP Majha
मधल्या फळीतील खेळाडुंच्या संथ खेळीवर सचिन तेंडुलकरची नाराजी
भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याने भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांच्या संथ खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिन म्हणाला की, मधल्या फळीत एम. एस. धोनी आणि केदार जाधवमध्ये चांगली भागिदारी पाहायला मिळाली खरी, परंतु दोघांनी खूपच संथ धावा केल्या. तर भारतीय फलंदाजांनी अफगाणी स्पिनर्सना डोक्यावर बसवल्याचा आरोप माजी क्रिकेटर के. श्रीकांत यांनी केला आहे.
धोनीने या सामन्यात अवघ्या 53.85 च्या स्ट्राईक रेटने 52 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा केल्या. तर केदार जाधवने 3 चौकार आणि एका षटकारासह 68 चेंडूत 52 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने मात्र चांगली फलंदाजी केली. विराटने 63 चेंडूत 67 धावा केल्या. विराट आणि केदारच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफागाणिस्तानसमोर 225 धावांचे आव्हान उभे केले. अखेर भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.
Getty Images