पुणे : जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांची गरिबी आणि वार्धक्यामुळे झालेली हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने काही महिन्यांपूर्वी सर्वांसमोर आणली होती. त्यानंतर तुपेंना मदत करण्यासाठी अनेक संस्था आणि लोक पुढे आले. पुण्यातील ज्या वाकडेवाडी भागातील झोपडीवझा घरात बंडू तुपेंच सगळं आयुष्य गेलं त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी घर बांधून देण्याच ठरलं आहे.
या घराच बांधकाम पूर्ण झालं असून हे घर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उत्तम बंडू तुपेंना सोपवण्यात आलं. पक्षाघाताने तुपे पती-पत्नी दोघेही बोलू शकत नाहीत. पण आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना दखल घेतली गेल्याने तुपे पती-पत्नींचा चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसत होतं.
याआधी राज्य सरकारने त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत केली आहे. राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते त्यांना पाच लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला होता. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी त्यावेळी सांगितलं.
समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांना उतारवयात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घरातील साहित्य कमी आणि त्यांनी लिहलेल्या साहित्यामुळे मिळालेल्या पुरस्कार आणि पदकांची संख्याच जास्त आहे. हे पुरस्कार नीट ठेवायलाही त्यांच्याकडे पुरेशी जागाही नव्हती.
उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती
कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.
भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आज यापैकी एकही पुस्तक त्यांच्याकडे दाखवायला देखील नाही. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली. ती आठवून आजही जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येतात.
पाहा स्पेशल रिपोर्ट