पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्राला आता वारुणराजासोबतच आषाढी वारीचे वेध लागले आहेत. त्यानिमित्ताने आज (रविवार) अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा शौर्य अश्व जगतगुरु संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूकडे रवाना झाला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या (सोमवार) देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.


मोहिते पाटील यांच्याकडे रिंगणाच्या अश्व सेवेची जबाबदारी आहे. पालखी सोहळ्यातील मानाच्या रिंगण सोहळ्यात हा शौर्य अश्व पताका घेऊन रिंगणात धावतो. गेली 30 वर्षे दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील कुटुंबाकडून ही सेवा अबाधित चालत आली आहे. आज श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी शौर्य अश्वाचे सालंकृत पूजन करून त्याला देहूकडे रवाना केले.

प्रशिक्षक सोहेल खान हे या मारवाड जातीच्या शौर्य अश्वाची वर्षभर देखभाल करतात. शौर्यला हरभरा, गुळ, दूध, तुप, गव्हाचा भुस्सा असा खुराक दिला जातो. तर आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर अगोदर खुराकासोबतच शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त विशेष खाद्य दिले जाते. तसेच शौर्यची तेलाने मॉलिश करुन सर्वांग तगडे ठेवले जाते. प्रशिक्षक सोहेल आणि शौर्यवर मानाची पताका धरणारे वैभव गायकवाड हे दोघे गोल रिंगणात धावण्याचे शौर्यला प्रक्षिक्षण देतात.

आषाढी वारीसाठी रवाना होताना शौर्यसोबत डॉक्टर आणि 5 जणांची टिम निगराणी व देखभालीसाठी पाठवली जाते. वारीच्या वाटेवर शौर्यला हिरवा चारा, गव्हाचा भुस्सा, दूध, तुप, हरभरा, गुळ असा खुराक दिला जातो.

वारीत अश्वांची गोल व उभी रिंगणे केली जातात. त्यासाठी शौर्यकडून रिंगण धावण्याचा सराव करुन घेतला जातो. वारीत अश्वांना दररोज 15 ते 20 किलोमीटर चालण्यासोबत रिंगणात धावावे लागते त्यासाठी शौर्यला महिनाभर विशेष प्रशिक्षण दिले जाते.