लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करुन फायनलमध्ये धडक दिली आहे. संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर काढले आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाची एकतर्फी झुंज अपयशी ठरली.


या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले आहेत. त्यानंतर रिषभ पंत (56 चेंडूत 32) हार्दिक पंड्या (62 चेंडूत 32) या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्याफार धावांच्या फरकाने हे दोघेदेखील माघारी परतले. 31 व्या षटकात भारताची अवस्था 6 बाद 92 अशी होती. परंतु त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा मैदानात उतरला आणि त्याने भारतीयांच्या मनात विजयाच्या आशा पल्लवित केला. त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील साथ देत होता.

48 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजा 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याची संपूर्ण मदार धोनीच्या खांद्यावर येऊन पडली. 49 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर धोनीने सणसणीत षटकार ठोकला. त्यामुळे धोनी हा सामना भारताला जिंकून देईल असा विश्वास सर्व भारतीयांनी व्यक्त केला. याच षटकातील पुढच्या चेंडूवर धाव घेता आली नाही.

49 व्या षटकातील तिसरा चेंडू धोनीने टोलवला. परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी धोनीला या चेंडूवर दोन धावा घेणे गरजेचे होते. परंतु दुसरी धाव घेत असताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने जबरदस्त थ्रो करुन धोनीला धावबाद केले. एक-दोन इंचांच्या अंतराने धोनी बाद झाला आणि त्याच ठिकाणी भारताने हा सामना गमावला.

धोनी माघारी परतत असताना कॉमेंट्री करणारा आकाश चोप्रा म्हणाला की, "...और धोनी के साथ भारत की उम्मीदे पॅव्हेलियन की ओर लौट रही है." मार्टीन गप्टीलच्या त्या एका थ्रोच्या जोरावर भारताने हा सामना गमावला असल्याचे बोलले जात आहे.

गप्टीलचा जबरदस्त थ्रो पाहा


2015 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा हाच मार्टीन गप्टील यंदाच्या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पहिला सामना श्रीलंकेशी झाला. या सामन्यात गप्टीलने 73 धावांची खेळी केली. परंतु त्यानंतरच्या एकाही सामन्यात गप्टीलला त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. पुढच्या आठ सामन्यांमध्ये गप्टीलने 25, 0, 35, 0, 5, 20, 8, 1 धावा केल्या आहेत. स्पर्धेत फ्लॉप ठरलेला गप्टील भारताला चांगलाच महागात पडला आहे.