मुंबई : विश्वचषकातील समालोचक आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज संजय मांजरेकर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यामध्ये ऑलराऊण्डर रवींद्र जाडेजावरुन टशन पाहायला मिळत आहे. मांजरेकरने अखेर वॉनला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं दिसत आहे.

'ब्रेकिंग न्यूज! संजय मांजरेकरने मला ब्लॉक केलं आहे' असं ट्वीट वॉनने स्क्रीनशॉट शेअर करत केला. जाडेजाला परिपूर्ण खेळाडू न मानत संजय मांजरेकरने त्याच्याऐवजी पूर्णवेळ गोलंदाज किंवा पूर्णवेळ फलंदाजाला संघात सामील करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर जाडेजाने ट्वीट करत संजय मांजरेकरला खेळाडूंचा सन्मान राखण्याविषयी सांगितलं होतं.




विशेष म्हणजे भारताने विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत मजल मारल्यानंतर मांजरेकरने जाडेजाला संघात स्थान देण्याचा उल्लेख केला. हे पाहून मायकल वॉनने मांजरेकरची थट्टामस्करी करण्याचा प्रयत्न केला. 'तुम्ही अशा एका खेळाडूला निवडलं आहे, जो परिपूर्ण नाही' असं ट्वीट वॉनने मांजरेकरांना टॅग करत केलं. यावर उत्तर देताना 'वॉन माझ्या मित्रा, मी भाकित वर्तवलं आहे, हा माझा संघ नाही' असं मांजरेकर म्हणाला.


मायकल वॉनने इन्स्टाग्रामवर संजय मांजरेकरचा फोटो एडिट करुन शेअर केला आहे.


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वाईट कामगिरी केल्यानंतरही कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना पुढील सामन्यात स्थान देऊ, असं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजय मांजरेकरने 'आयएएनएस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र जाडेजाने ट्वीट करत संजय मांजरेकरला खेळाडूंचा सन्मान राखण्यास सांगितलं. 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि मी अजूनही खेळतो. ज्यांनी एखादी गोष्ट साध्य केली आहे, त्यांचा मान राखायला हवा. मी तुमच्या तोंडाच्या आजाराविषयी बरंच काही ऐकली आहे' अशी तिरकस टीका जाडेजाने केली होती.


'चहल आणि कुलदीप यांच्या खराब कामगिरीनंतरही टीममध्ये रवींद्र जाडेजाला सहभागी करावं का?' असा प्रश्न मांजरेकरला विचारण्यात आला होता. 'मी अनियमित खेळाडूंचं समर्थन करत नाही. जाडेजा सध्या वनडे कारकीर्दीत अनियमितपणे खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो, मात्र वनडेमध्ये मी त्याच्या जागी एखादा फलंदाज किंवा गोलंदाज निवडेन' असं उत्तर मांजरेकरने दिलं.

विश्वचषकाच्या साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या भारताच्या अंतिम सामन्यात रवींद्र जाडेजाला संघात स्थान मिळालं. त्यानंतर मांजरेकरने आपला विचार बदलत जाडेजाला चतुर खेळाडू म्हटलं होतं.