टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी संदीप पाटलांची रवी शास्त्रींशी लढत
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 02:12 AM (IST)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड चांगलीच चुरशीची ठरणार, असं चित्र निर्माण झालं आहे. रवी शास्त्री यांनी अगदी अलिकडच्या काळात अठरा महिने भारतीय संघाच्या टीम डायरेक्टरची जबाबदारी सांभाळली होती. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या कराराची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी एक जाहिरात देऊन, इच्छुक उमेदवारांना 10 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यापाठोपाठ निवड समिती सदस्य विक्रम राठोड, प्रवीण अमरे, लालचंद राजपूत आणि ऋषीकेष कानिटकर अशी बडी नावं या पदाच्या शर्यतीत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या तरी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि संदीप पाटील या दोन बडया नावांमध्ये शर्यत निर्माण झाली आहे.