नवी दिल्ली: भारताची पिस्टल नेमबाज हीना सिद्धूनं इराणमधल्या कडक ड्रेस कोडमुळं आशियाई एअरगन नेमबाजी विजेतेपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. हीना या स्पर्धेत 10 मीटर पिस्टल प्रकाराची गतवेळची सुवर्णविजेती आहे.


यंदा इराणची राजधानी तेहरानमध्ये 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत आशियाई एअरगन नेमबाजीचं आयोजन केलं जाणार आहे. सर्व स्पर्धकांना शूटिंग रेंजवर तसंच सार्वजनिक ठिकाणी इराणच्या पेहरावाविषयीच्या नियमांचं पालन करावं लागेल असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. इराणमध्ये महिलांना पूर्ण शरीर झाकलं जाईल असा पेहराव तसंच हेडस्कार्फ घालणं बंधनकारक आहे. मात्र खेळाडूंवर आणि पर्यटकांवर अशा बद्धतीचं बंधन घालणं हीनाला मान्य नाही. तिनं या नियमाविषयी आपलं मत ट्विटरवरून व्यक्त केलं आहे. तसंच राष्ट्रीय रायफल संघटनेला आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचं कळवलं आहे.

दरम्यान, भारतीय संघातील अन्य महिला नेमबाजांनी इराणच्या परंपरेचा भाग म्हणून हे नियम मान्य केले आहेत. त्यामुळं भारताकडून हीनाऐवजी हरवीन सराओ या स्पर्धेत सहभागी होईल. त्याशिवाय रुचिका विनेरकर आणि सर्वेश तोमरही या स्पर्धेत पिस्टल नेमबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करतील.