विशाखापट्टणम: कर्णधार धोनीच्या टीम इंडियानं पाचव्या वन डेत न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा उडवून विशाखापट्टणममध्ये जणू दिवाळीच साजरी केली. भारतानं पाच वन डे सामन्यांची मालिकाही 3-2 अशी खिशात टाकली. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडचा डाव 79 धावांतच आटोपला.


अमित मिश्राच्या फिरकीसमोर किवी फलंदाजांनी अक्षरश:  नांगी टाकली. मिश्रानं पाच विकेट्स काढून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, भारतानं नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 270 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं 50 षटकांत सहा बाद 269 धावा केल्या होत्या.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं अर्धशतकं झळकावली. रोहितनं 65 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 70 धावांची खेळी केली. तर विराटनं 76 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 65 धावा केल्या.

रोहित आणि विराटनं दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचली. मग विराटनं धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. धोनीनं 41 धावांची खेळी उभारली. केदार जाधवनंही 37 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी ट्रेण्ट बोल्ट आणि ईश सोढीनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.